ऊसदरावरून पश्चिम महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद मंगळवारी नाशिक जिल्ह्यातही उमटले. कळवण व ताहाराबाद येथे काही कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत खा. राजू शेट्टी व इतर नेत्यांच्या अटकेचा निषेध केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार यांच्या नेतृत्वाखाली सकाळी अकराच्या सुमारास काही कार्यकर्त्यांनी कळवण बस स्थानकात आंदोलन केले. उसाला तीन हजार रुपये भाव द्यावा, वसंतदादा साखर कारखान्याने दुसऱ्या हप्त्याची रक्कम त्वरित द्यावी, या मागण्यांसह सभासदांना दिवाळीसाठी साखर द्यावी, अन्यथा कारखान्यावर मोटारसायकल मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. पश्चिम महाराष्ट्रात अटक करण्यात आलेले संघटनेचे नेते खा. शेट्टी यांची त्वरित सुटका करण्यात यावी, अशी मागणीही पगार यांनी केली. सुमारे अर्धा तास हे आंदोलन सुरू होते. कळवणचे आंदोलन एकीकडे आटोपते घेतले जात असतानाच दुपारी दोनच्या सुमारास बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे चौफुलीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्रप्रमुख दीपक पगार, ताहाराबादचे सरपंच संदीप साळवे, केवळ भामरे, पोपट अहिरे, पोपट गवळी, आदींच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको करण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.