शेतीला पाणी, खारभूमीचे प्रश्न, अतिरिक्त भूसंपादन, नुकसान भरपाई यासारख्या शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. श्रमिक मुक्तिदलाच्या नेतृत्वाखाली पेझारी ते अलिबाग काढण्यात आलेल्या मोर्चात धेरंड शाहापूरमधील शेतकरी सहभागी झाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत येत्या ५ एप्रिलला सर्व विभागांची बठक बोलवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले. सातत्याने पाठपुरावा करूनही, शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सुटत नसल्याने आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी हा मोर्चा काढला. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राजन भगत यांच्यासह धेरंड शहापूर परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते माणकुळे, धेरंड शहापूर, मेढेखार ते सांबरी या परिसरातील खारलँण्ड बंधाऱ्यांसाठी जादा निधी मिळावा, आंबा खोरे प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांना मिळावे, यासाठी सांबरी ते शहापूर अशी पाइप लाइन टाकण्यात यावी, टाटा पॉवरच्या प्रकल्पासाठी केलेले अतिरिक्त भूसंपादन रद्द करावे, खारभूमी योजनांच्या देखभालीमुळे शेती धोक्यात आली आहे, अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या वर इतर मागण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. पेझारी येथून सकाळी ११च्या सुमारास निघालेला हा मोर्चा संध्याकाळी अलिबाग येथे पोहचला. मोर्चातील प्रतिनिधीशी जिल्हा प्रशासनाने चर्चा केली. यावेळी यानंतर प्रलंबित मागण्यांसाठी येत्या ५ एप्रिल २०१६ रोजी सर्व विभागांची बठक बोलावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले.