महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातून समोर आली आहे. नैसर्गिक संकटामुळे शेती उत्पादनात होणारी घट, शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे कर्जाचा वाढता डोंगर अशा विविध कारणांमुळे देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षभरात १० हजार ८८१ शेतकरी, शेतमजुरांनी आत्महत्या केली असून महाराष्ट्र शेतकरी आत्महत्येच्या आकडेवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट केलं आहे.

“देशात शेतकरी आणि शेतमजुरांच्या सर्वाधिक आत्महत्या या महाराष्ट्रात झाल्याची NCRB ची आकडेवारी हादरवणारी आहे. हे दुष्टचक्र वर्षानुवर्षे सुरु असून महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याला शोभणारं नाही. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यात सर्वच सरकारांना अपयश आलं, ही वस्तुस्थिती आहे. या विषयाकडे राजकारणापलिकडे जाऊन बघण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार, विरोधी पक्ष, तज्ज्ञ मंडळी आणि सामाजिक संस्था यांनी एकत्रित येऊन एक ठोस कार्यक्रम आखून तो राबवण्याची आणि आपल्या अन्नदात्याच्या गळ्यातील फास काढण्याची गरज आहे.” .” असं रोहित पवारांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

याचबरोबर, “त्यामुळं माझी सरकारला विनंती आहे की, यावर तातडीने पुढाकार घ्यावा आणि विरोधी पक्षानेही सकारात्मक प्रतिसाद देत शेतकरी आत्महत्येचा राज्यावर लागलेल्या डाग पुसून काढण्यासाठी मदत करावी.” अशी मागणी देखील रोहित पवारांनी केली आहे.

शेतमजुरांच्याही आत्महत्यांचा आकडा डोळ्यात अंजन घालणारा –

देशात शेतकरी आत्महत्या वाढत असतानाच शेतकऱ्यांकडे राबणाऱ्या शेतमजुरांच्याही आत्महत्यांचा आकडा डोळय़ात अंजन घालणारा आहे. गेल्या वर्षभरात ५ हजार ५६३ शेतमजुरांनी आत्महत्या केल्या आहेत. यासोबतच स्वत:च्या मालकीची शेती नसलेले पण भाडेतत्त्वावर शेती करणाऱ्या ५१२ जणांनी आत्महत्या केली आहे. कृषीक्षेत्रातील ही आकडेवारी मागील वर्षीच्या तुलनेत २०४ ने अधिक आहे.