विमा महागल्याने संत्रा उत्पादक संकटात ; आधी हेक्टरी चार हजार , आता हेक्टरी १२ हजार रुपये !

करोनाच्या संचारबंदीच्या काळात संत्र्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात व्यापाऱ्यांना संत्रा विकावा लागला

मोहन अटाळकर, लोकसत्ता

अमरावती : नोटाबंदीपासून ते करोनाच्या संकटापर्यंत चहूबाजूंनी संत्रा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असताना फळपीक विम्याचे नवे संकट उभे ठाकले आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत संत्रा फळपिकासाठी विम्याच्या हप्त्यात तीन पटीने वाढ केल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

करोनाच्या संचारबंदीच्या काळात संत्र्याला मागणीच नसल्याने शेतकऱ्यांना मातीमोल भावात व्यापाऱ्यांना संत्रा विकावा लागला. त्यातही संत्र्यावर येणारे रोग, फळगळती, संत्राला मिळणारा अत्यल्प भाव, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी अगोदरच विवंचनेत असताना अचानक संत्रा फळपीक विमा महागला आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांचा वाटा ४ हजार रुपये प्रति हेक्टर होता, मात्र आता तोच फळपीक विमा १२ हजार रुपये प्रति हेक्टर झाला आहे.

पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल यासाठी फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे. हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. फळपीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना राबवली जात आहे. मात्र अमरावती जिल्ह्यामध्ये २०२१-२२ आंबिया बहार संत्रा फळपीक विमा अचानक तीन पटीने महागल्याने संकटात नवी भर पडली आहे.

२०२०-२१ मध्ये संत्रा विम्याची रक्कम प्रति हेक्टरी ४ हजार रुपये होती. यावर शेतकऱ्यांना विमा संरक्षित मिळणारी रक्कम ८० हजार रुपये इतकी होती. परंतु आता शासनाने याच विम्याची रक्कम तीनपट वाढवून प्रति हेक्टरी रक्कम बारा हजार रुपये केली आहे. अशातच वाढवलेल्या विम्याच्या रकमेच्या तुलनेत संरक्षित रक्कम शासनाने वाढवायला हवी होती. परंतु उलट शासनाने संरक्षित रक्कम न वाढवता मागीलच ८० हजार रुपये हेक्टर कायम ठेवली आहे. त्यातही गारपीट विम्यासाठी शेतकऱ्यांना जास्तीचा १३३३ रुपये हेक्टरी वेगळा विमा भरावा लागेल, असे परिपत्रकात नमूद केलेले आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार केंद्राने त्यांचा विमा हप्ता ३० टक्के दरापर्यंत मर्यादित केला आहे. त्यामुळे ३० टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य शासन व शेतकऱ्यांना स्वीकारणे क्रमप्राप्त आहे. या योजनेत ३० ते ३५ टक्क्यांपर्यंतचे अतिरिक्त ५ टक्के विमा हप्ता दायित्व राज्य शासनाने स्वीकारले असून ३५ टक्क्यांवरील विमा हप्ता राज्य सरकार आणि शेतकऱ्यांना पन्नास-पन्नास टक्क्यांपर्यंत भरायचा आहे, असे शासन निर्णयात नमूद आहे.

पारंपरिक शेती पद्धतीपेक्षा फळबागांचे महत्त्व अधिक वाढत आहे. हवामान आणि भौगोलिक परिस्थितीनुसार फळांची लागवड केली जाते. जेवढे अधिकचे उत्पन्न यामधून आहे तेवढय़ाच प्रमाणात तोटाही आहे. पिकांना विम्याचे संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत होईल यासाठी फळपीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.

नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळपिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे, शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे, कृषी क्षेत्रासाठीच्या पतपुरवठय़ात सातत्य राखणे, ही योजनेची प्रमुख वैशिष्टय़े आहेत.

अधिसूचित फळपिकांखाली एकूण २० हेक्टर व त्यापेक्षा जास्त क्षेत्र असणाऱ्या महसूल मंडळात योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार महसूल मंडळे ठरविण्यात आली आहेत. स्थानिक पातळीवरून तसा अहवाल गेल्यानंतर कोणत्या मंडळाचा या योजनेसाठी सहभाग करून घ्यावयाचा हे ठरवले जाते. ही योजना अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील अधिसूचित फळपिकांसाठी आहे, ती शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे.

मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी फळपीक विम्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या वर्षी फळपीक विमा काढण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात घटणार आहे. संत्रा फळपीक विमा हा शेतकऱ्यांच्या हिताकरिता आहे की कंपनीच्या फायद्यासाठी, असा प्रश्न पडला आहे. संत्रा उत्पादक शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटाचा सातत्याने सामना करीत फळपिकांचे रक्षण करतो. परंतु यादरम्यान विमा महागला, त्या तुलनेत शेतकऱ्यांना विमा संरक्षणाची मिळणारी रक्कम कमी आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विमा हप्ता कमी करायला हवा.

रुपेश वाळके, संत्री उत्पादक शेतकरी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Farmers angry over triple insurance premium for orange crop zws

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या