|| दिगंबर शिंदे

सांगली : अकरा हजारावर गेलेला सोयाबीनचा दर कोसळल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीवर बहिष्कार टाकला आहे. जिल्ह्यात दसऱ्यानंतर  एरवी २५ हजार क्विंटलपर्यंत होणारी आवक यंदाच्या हंगामात ३ हजार क्विंटलच झाली आहे.

सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यामध्ये सांगली बाजारात सोयाबीनचा दर ११ हजार ४०० रुपये क्विंटलवर पोहोचला होता मात्र एक आठवड्यात हा दर कमी होत जाऊन सध्या किमान दर ४ हजार ५००  तर कमाल दर ५ हजार रुपये क्विंटल झाला आहे. किमान हमी दर ३ हजार ८८० रुपये असला तरी खाद्यतेलाचे चढे दर पाहता सोयाबीनला चांगला भाव लाभण्याची चिन्हे असताना दर पडल्याने शेतकऱ्यांनी सौद्यासाठी बहिष्कार टाकला आहे.

गणेश विसर्जनानंतर खरीप हंगामात केलेले सोयाबीन बाजारात विकून दसरा-दिवाळीची आर्थिक  व्यवस्था करण्याचा प्रघात आहे.यंदा महापुराने सोयाबीनचे नुकसान झाले असून काढणीच्या वेळीच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.   गरजेप्रमाणे सोयाबीनची गावपातळीवरील आठवडा बाजारातच विक्री केली जात असल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.