पारनेर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी व्हावे, या मागणीसाठी आंदोलनातील शेतकऱ्यांच्या मुलांनी रविवारी राळेगणसिद्धीत येत थाळीनाद आंदोलन केले. दिल्लीत आंदोलनास जागा मिळाल्यास शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करू, हे आपले शेवटचे आंदोलन असेल, असे हजारे यांनी स्पष्ट केल्यानंतर आंदोलकांचे समाधान झाले.

दिल्लीत रामलीला किंवा जंतरमंतर येथे जागा मिळाली तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेवटचे आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ  समाजसेवक अण्णा हजारे आंदोलकांना सांगितले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनात हजारे यांनी सहभागी व्हावे यासाठी पंकज प्रकाश श्रीवास्तव (बिहार), मोहित शर्मा (दिल्ली), राजरतन शिंदे, प्रदीप मेटी, किरणकुमार वर्मा, सतीशकुमार राज पुरोहित (कर्नाटक) या सहा शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने रविवारी राळेगणसिद्धी येथे हजारे यांच्याशी सुमारे एक तास चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने राळेगणसिद्धीत प्रवेश केल्यानंतर थाळी वाजवत आंदोलन करण्यास सुरुवात केली. हजारे यांच्या कार्यालयाकडून अण्णा भेटणार असल्याचे सांगितल्यानंतर थाळीनाद थांबवून त्यांनी हजारे यांची भेट घेतली. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

देशातील सर्व तुरुंग ज्या वेळी भरून जातील त्या वेळी खऱ्या अर्थाने सरकारला जाग येईल. त्यासाठी देशातील शेतकऱ्यांसह सर्व जनतेने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी देशातील सर्व शेतकऱ्यांनी, जनतेने रस्त्यावर उतरले पाहिजे.

– अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक