रत्नागिरी :  रत्नागिरी जिल्ह्यतील अनेक बागायतदारांची वीज बिले कृषी पंपाच्या दरानुसार न आकारलेली बिले थकित राहिल्यामुळे पावस पंचक्रोशीतील सत्तरजणांची जोडणी तोडली असल्याची तक्रार लाईक रायझिंग सोसायटीचे लाईक फोंडू यांनी केली आहे. ते म्हणाले की, ऊस शेतकऱ्यांकडून कृषी पंपाच्या दरानुसार बिले आकारली जातात. पण कोकणातील आंबा, काजू, नारळ लागवडीसाठी वापरलेल्या कृषीपंपाची बिले सर्वसाधारण दराने काढली जातात. त्यामुळे लाख, सव्वालाख रुपयांपर्यंत बिले आली आहेत. संबंधित बागायतदारांनी ती न भरल्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी त्यांची वीजजोडणी तोडली आहे.

ते म्हणाले की, वातावरणातील बदलांमुळे होणाऱ्या विपरीत परिणांमधून शेतकरी बाहेर पडत आहे. त्यात महावितरणकडून त्रास दिला जात आहे. शेतकरी बागायतदारांचे शेतीपंप रद्द करुन ते बागायतीतील पंप जोडणी करुन सर्वसाधारण दराने बिले आकारली जात आहेत. गेली तीन वर्षे बिले माफ केली, आता दंडात्मक दराने मागील बिलांची जोडणी तोडून वसुली चालली आहे. भाजीपाला, बागायत, रोपवाटिकेला आवश्यक पाणी मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. विधानसभेत यावर आमदार शेखर निकम यांनी आवाज उठवला होता. त्यावेळी विजजोडणी तोडणे बंद करावे असे निश्चित झाले होते. प्रत्यक्षात त्याची अमंलबजावणी कोकणात झालेली नाही. महावितरणच्या रत्नागिरीतील अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला असता समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. तुमचे बिल कमी करुन देऊ, असे सांगून वेळ मारुन नेण्यात येते. बिलांविषयी परिपत्रक मागितले तर तेही देत नाहीत. एखाद्या ग्राहकाचे बिल थकल्यानंतर नोटीस दिली जाते. तीन महिन्यात ते भरले गेले नाही तर कारवाई करावी, असे निकषात आहे. पण तसे केले जात नाही, असाही आरोप फोंडू यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी केला आहे.  पावस आंबा उत्पादक संघाचे बावा साळवी, अक्रम नाखवा, नंदु मोहिते, अमृत पोफडे, इम्रान काझी आदी उपस्थित होते.