गुणवत्ता नसलेल्या बियाण्यांची वसईत विक्री

सुहास बिऱ्हाडे,  लोकसत्ता

वसई: विविध समस्या आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या वसई-विरारमधील शेतकऱ्यांना आता बनावट बी-बियाणांच्या नव्या समस्यांना सामोरे जावे  लागत आहे. बी-बियाणे बनावट असल्याचे आढळल्यानंतर मोठय़ा आशेने लागवड केलेला भाजीपाला काढून फेकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी वसईतील शेतकऱ्यांनी केली आहे.

वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्टय़ात मोठय़ा प्रमाणावर शेती केली जाते. वसईत पिकवलेला भाजीपाला मुंबई आणि परिसरात वितरित केला जातो. त्यावर वसईतील हजारो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. निसर्ग चक्रीवादळ आणि अवेळी आलेल्या पावसामुळे वसईतील शेतकऱ्यांची भातशेती पाण्यात गेली होती. त्यातच टाळेबंदीमुळे वाहतूक सेवा बंद असल्याने शेतमाल पडून होता. त्यामुळे खचलेल्या शेतकऱ्यांनी नव्या उमेदीने भाजीपाल्याच्या लागवडीला सुरुवात केली आहे. सध्या भाज्यांचा हंगाम सुरू आहे. वसईतील शेतकरी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करत असतात. त्यासाठी बियाणे पेरत असतात.  यंदा शेतकऱ्यांना मिळालेले बी-बियाणे बनावट असल्याचे आढळून आले आहे.

लाल भाजी,  मेथी, चवळी, कोथमीर, नवलकोसस पालक, मुळा आदींच्या बियांची लागवड केली असता त्यांची वाढ होत नसल्याच्या तक्रारी वसईतील विविध भागांतील शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याबाबत माहिती देताना वसईच्या गास गावातील शेतकरी गॉडसन रॉड्रिक्स यांनी सांगितले की, पहिल्यांदा असा प्रकार घडल्याचे मी पाहिले आहे. बनवाट बी बियाणे बाजारात आल्याने भाजीपाला पिकलाच नाही. त्यामुळे मेहनतीने लागवड केलेला भाजीपाला काढून फेकावा लागला आहे.

विरारच्या शिरगाव येथील तरुण शेतकरी प्रवीण पाटील यानेदेखील बनावट बी बियाणांमुळे मोठा फटका बसल्याची तक्रार केली आहे. मी शेतात लावलेला वाडा कोलम भाताचे बियाणे नकली असल्याने भाताची रोपे वाया गेल्याचे त्याने सांगितले. सध्या शेतात कोथंबिर, मुळा आणि नवलकोल यांची लागवड करण्यासाठी आलेले बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे तो म्हणाला. यामुळे भाज्यांना, भाताला जसा उतारा यायला हवा तसा येत नाही, रोपांची वाढ होत नाही. जरी भाज्या आल्या तरी त्यात सत्त्व नसते, गुणवत्ता नसते अशी माहिती त्याने दिली.

कारवाईचे निर्देश

वसईतील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालघर जिल्ह्याचे खासदार राजेंद्र गावित यांनी वसई तहसीलदार कार्यालयात शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी शेतकऱ्यांनी बनावट बी बियाणे बाजारात आल्याचा मुद्दा उपस्थित केला.  बनावट  बियाणांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी  गावित यांनी शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले. बी बियाणे विक्रीच्या दुकानांची कृषी अधिकाऱ्यांनी पाहणी करणे गरजेचे असते. मात्र कृषी अधिकारी अशी पाहणी करत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी यावेळी केल्या.

शेतकऱ्यांकडे बनावट बी -बियाणे आल्याच्या तक्रारी आलेल्या आहेत. यापूर्वी अशा तक्रारी आल्या नव्हत्या. यासंदर्भात तक्रारींची शहानिशा करून संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जाईल.

— तरुण वैती, कृषी अधिकारी, वसई

वसईतील शेतकरी आधीच विविध समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यात बनावट बी -बियाणांची भर पडली आहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मी कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

— राजेंद्र गावित, खासदार, पालघर

शेतकऱ्यांना गुणवत्ता नसलेले निकृष्ट दर्जाचे बनावट बी बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. कृषी अधिकाऱ्यांचे यावर लक्ष नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होत आहे. — प्रवीण पाटील, शेतकरी शिरगाव