अलिबाग – विशिष्‍ट चव आणि औषधी गुणधर्म यामुळे प्रसिदध असलेल्‍या अलिबागच्‍या पांढरया कांद्याच्‍या काढणीला सुरूवात झाली आहे. शेतकरी कांदा पिकाची काढणी करण्‍यात सध्‍या गुंतलेले पहायला मिळताहेत. पाऊस लांबणीवर पडल्‍याने उशिरा लागवड झाली त्‍यामुळे यंदा पांढरा कांदा बाजारात यायला काहीसा उशीर होणार आहे.

अलिबाग तालुक्यातील वेश्‍वी, वाडगाव, नेहुली, कार्ले, खंडाळे, पवेळे, रुळे, ढोलपाडा, सागाव, तळवली अशा मोजक्याच गावातच पांढऱ्या कांद्याचे उत्पादन घेतले जाते. या कांद्याला रुचकर चव आणि औषधी गुणधर्म असल्याने मोठी मागणी असते. मात्र मागणीच्या तुलनेत कांद्यांचे उत्पादन कमी आहे. त्यामुळे हा कांदा निर्यातक्षम असूनही तो परदेशात पाठवला जाऊ शकत नाही.

यावर्षी परतीच्‍या पावसाबरोबरच अवकाळी पावसानेही शेतकरयांना दगा दिला. परतीचा पाऊस लांबलेला असतानाच काही दिवसात अवकाळी पावसानेही हजेरी लावली. त्‍यामुळे शेतकरी हवालदिल झाला. परीणामी दरवर्षी नोव्‍हेंबर मध्‍ये होणारया कांदा लागवडीला डिसेंबर महिन्‍याच्‍या पहिल्‍या आठवडयात सुरूवात झाली. मात्र कृषी विभागाचे अचूक मार्गदर्शन आणि शेतकरयांनी घेतलेली मेहनत यामुळे यंदा कांद्याचे पीक चांगले असले तरी बाजारात कांदा उपलब्‍ध होण्‍यास उशीर होणार आहे. दरवर्षी प्रजासत्‍ताक दिनी पांढरा कांदा बाजारात येत असतो.

तीन वर्षांपूर्वी केंद्र सरकारच्या पेटंट विभागाने या पांढऱ्या कांद्याला भौगोलिक मानांकन दिले आहे. त्यामुळे कांद्याचे ब्रँण्डींग होण्यास आता मदत झाली. कांद्याच्या मागणीत चांगलीच वाढ झाली. ही बाब लक्षात घेऊन आता पांढऱ्या कांद्याचे उत्पादन वाढवण्यासाठी कृषी विभागाने प्रय़त्न सुरू केले असून, भविष्‍यात एक हजार हेक्टर वर या कांद्याची लागवड करण्याचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने ठेवले आहे.

अलिबाग तालुक्यातील अडीचशे हेक्टर क्षेत्रावर पांढरा कांद्याची शेती केली जाते. साधारण पाच हजार टन उत्पादन दरवर्षी काढले जाते. यात वाढ करण्याच्‍या दृष्‍टीने कृषी विभागाने कांद्याच्‍या बीजोत्‍पादनाचा कार्यक्रम हाती घेतला. त्‍यासाठी शेतकऱ्यांचा कांदा गट तयार केला. २८२ शेतकरयांच्‍या सहकार्यातून २.३६ हेक्‍टर क्षेत्रावर खास कांद्याचे बीजोत्‍पादन करण्‍यात आले. बियाणे उपलब्‍ध झालेले बियाणे शेतकरयांना पुरवून त्‍यांना पांढरया कांद्याची लागवड करण्‍यास प्रवृत्‍त केले.

दरवर्षीच्‍या तुलनेत यंदा कांदा काहीसा उशिरा आला आहे. त्‍यात खराब हवामानाचा फटकादेखील या पिकाला बसतो आहे. हवामानात सुयोग्‍य बदल झाला नाही तर पिकावर परीणाम होण्‍याची शक्‍यता आहे. – सतीश म्‍हात्रे, कांदा उत्‍पादक शेतकरी