मुंबई : स्थानिक शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण व्हावा. सर्व प्रकारच्या शेतीमालाला ग्राहक मिळावा, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टोलनाक्यांच्या जवळील जागा शेतीमाल विक्रीसाठी भाड्याने देऊन शेतकरी बाजार सारखा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिले आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, सचिव (बांधकामे) आबासाहेब नागरगोजे, सचिव (रस्ते) राजभोज आदी उपस्थित होते. या बैठकीत भोसले यांनी वरील आदेश दिले.

राज्यातील विविध टोलनाक्यांवर स्थानिक शेतकरी फळे, भाज्या विकतात. अशा शेतकऱ्यांना टोल प्लाझाजवळच भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी बाजार सारखा उपक्रम राबविता येईल. यातून त्या स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाला ग्राहक उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरच आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण होईल. शेतीमालाच्या वाहतुकीचा खर्च, वेळ वाचेल. त्यासाठी राज्यातील ज्या टोलनाक्यांच्या शेजारी जागा उपलब्ध आहे, अशा ठिकाणच्या जागा भाडेतत्वावर देऊन प्रायोगिक तत्वावर शेतकरी बाजार हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आदेश भोसले यांनी दिले आहेत.

कुंभमेळ्याच्या कामांचा आढावा

नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणारी कामे, महामार्गावरील जनसुविधा केंद्रे यासह विविध विषयांचा मंत्री भोसले यांनी आढावा घेतला. कुंभमेळ्याची कामे दर्जेदार व्हावीत याकडे लक्ष द्यावे. कामांचा वेळोवेळी आढावा घ्यावा, अशा सूचनाही भोसले यांनी दिल्या.