ऊसदराबाबत सरकारने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेले आंदोलन तूर्तास २४ नोव्हेंबपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. साखर उद्योगासंदर्भातील विविध संघटना, मंत्रिमहोदय व अधिकाऱ्यांच्या समवेत बैठक घेण्याचा निर्णय शासनाने घेतल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी कळवले असल्याने आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत असल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. यानंतर उपस्थित हजारो शेतकऱ्यांना निर्धार शपथ देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले.
यशवंतराव चव्हाण समाधीचे दर्शन घेऊन सुरू करण्यात आलेल्या या आक्रमक आंदोलनात राजू शेट्टी, सदाभाऊ खोत व अन्य नेत्यांनी राज्यकर्त्यांसह साखर कारखानदारांचे धिंडवडे काढले.
सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांकरवी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय राजू शेट्टी यांना कळविण्यात आला. यावर शेट्टी यांनी याबाबतची माहिती जाहीर केली. त्यात ऊस दरासंदर्भात राज्य साखर संघ, साखर कामगार संघटना व शेतकरी संघटनांचे नेते व संबंधित मंत्र्यांसह अधिकाऱ्यांसमवेत व्यापक बैठक घेण्याचे शासन दरबारी मान्य झाल्याचे सांगण्यात आले.