सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून जाणारा शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्ग उभारण्यासाठी जमिनी देण्यास तीव्र विरोध करीत जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले. बार्शी, सांगोला, मोहोळ, पंढरपूर आदी तालुक्यांत झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.
सोलापूर जिल्ह्यात पाच तालुक्यांतील १५४ गावांतील शेतजमिनी शक्तिपीठ राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध डावलून संपादित करण्याचा घाट घातला जात आहे. बाधित शेतकऱ्यांच्या जमिनींची मोजणी करण्यासाठी आलेल्या प्रशासकीय पथकांना परत पाठविण्यात आले होते. तरीही शासनाकडून जमिनी संपादित करण्यासाठी अट्टाहास सुरू असल्याचा आरोप मोहोळ येथील शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते ॲड. श्रीरंग लाळे यांनी केला. शक्तिपीठ महामार्गासाठी कोणाचीही मागणी नसताना केवळ गोव्यात अदानी यांच्या पोर्टसाठी देवदेवता आणि शक्तिपीठाच्या नावाखाली सरकारने हा खटाटोप चालविला आहे, असाही आरोप ॲड. राजळे यांनी केला. बार्शी तालुक्यातील शेळगाव आर गावात झालेल्या आंदोलनात बाधित शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहण केल्यास विरोध करू, असा इशारा दिला.
मोहोळ येथे पंढरपूर पालखी महामार्गावर झालेल्या चक्का जाम आंदोलनामुळे तेथील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. हीच परिस्थिती सांगोला, पंढरपूर, बार्शी आदी भागात दिसून आली. यापूर्वी याच भागातून सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्गासाठी जमिनी संपादित झाल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा मागणी नसताना केवळ कोणाचे तरी हित जोपासण्यासाठी सरकारकडून शक्तिपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांना शेतशिवारातून हुसकावून लावले जात आहे, अशा शब्दांत बाधित शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.