scorecardresearch

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची प्रत्येक टप्प्यावर लूट ; गाळपाला जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड

ऊसतोडणीसाठी एकरी तब्बल १० ते १२ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत असून या सर्व गंभीर प्रकारावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.

आसाराम लोमटे, लोकसत्ता

परभणी : लागवड व मशागतीवर प्रचंड प्रमाणात खर्च केल्यानंतरही शेतातला उभा ऊस गाळपाअभावी वाळून जातो की काय या धास्तीने शेतकरी हादरला असून कोणत्याही परिस्थितीत ऊस गाळपासाठी जावा यासाठी संबंधित यंत्रणांचे उंबरठे झिजविणाऱ्या शेतकऱ्यांची आता प्रत्येक टप्प्यावर आर्थिक लूटमार सुरू झाली आहे. ऊसतोडणीसाठी एकरी तब्बल १० ते १२ हजार रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत असून या सर्व गंभीर प्रकारावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही.

गेल्या वर्षी प्रचंड प्रमाणावर उसाची लागवड झाल्याने साखर कारखान्यांचे गाळपाचे नियोजन आवाक्याबाहेर गेले. संपूर्ण मे महिना जरी गाळप सुरू ठेवले तरी हजारो एकरवरील ऊस तसाच राहील अशी परिस्थिती आहे. मात्र गेल्या काही दिवसांत ऊस तोडणीच्या यंत्रणांनी शेतकऱ्यांची लुबाडणूक सुरू केली आहे. अडलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर पैसे मोजावे लागत आहेत. सुरुवातीला साखर कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याकडे वशिला लावायचा, त्यानंतर तोडचिठ्ठी देणाऱ्या ‘स्लीपबॉय’ची मनधरणी करायची आणि ऊस तोडणी करणाऱ्या टोळीला एकरी आठ ते दहा हजार रुपये द्यायचे असा प्रकार सध्या सुरू आहे. एवढे सर्व केल्यानंतर पुन्हा शेतातून ऊस घेऊन जाणाऱ्या वाहनाला दीड हजार रुपये प्रत्येक फेरीसाठी ‘एन्ट्री’च्या नावाखाली द्यावे लागत आहेत.

मराठवाडय़ात सर्वत्र हजारो एकरवर उभा असलेला ऊस आणि तोडणीची अपुरी यंत्रणा यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून ऊस तोडणी यंत्र मराठवाडय़ात दाखल झाले मात्र या तोडणी यंत्रांमार्फत आपल्या उसाची तोड व्हावी यासाठी पुन्हा वेगळे अर्थकारण आकाराला येत असून यात शेतकऱ्यांचा बळी जात आहे. शेतातला ऊस गाळपाला गेला नाही तर वाळलेल्या उसाला अक्षरश: काडी लावावी लागणार आहे.

परभणी जिल्ह्यात एकही सहकारी साखर कारखाना नाही. सर्व सहा खासगी साखर कारखान्यांनी आतापर्यंत ३६ लाख टन उसाचे गाळप केले आहे. गंगाखेड शुगरने ११लाख, २६ हजार, ६४० टन उसाचे गाळप केले आहे तर त्यापाठोपाठ पूर्णा तालुक्यातील बळीराजा शुगरने सात लाख टन उसाचे गाळप केले आहे. तरी अद्याप जिल्ह्यात हजारो एकरावर ऊस गाळप अभावी शिल्लक आहे. हे सर्व साखर कारखाने आणखी किती गाळप करू शकतील आणि शेतातील उभ्या उसाच्या गाळपाचे करायचे काय याबाबत कोणाकडेही उत्तर नाही.

सध्या गाळपाअभावी शेतात शेतकऱ्यांचा ऊस वाळत चालला असून प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांची आर्थिक लूटमार सुरू आहे.

परभणी जिल्ह्यातील कारखान्यांचा साखर उतारा समाधानकारक यायला हवा मात्र तो जाणीवपूर्वक कमी दाखवला जात आहे.  सर्व उसाचे गाळप व्हावे यासाठी सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली, त्यानंतर मात्र काहीही झाले नाही. बाहेरच्या जिल्ह्यातील ऊस मोठय़ा प्रमाणावर कारखान्यांनी गाळप केला त्यामुळे जिल्ह्यातील ऊस तसाच राहिला. ऊस गाळपाला जावा यासाठी शेतकऱ्यांना प्रत्येक टप्प्यावर पैसे मोजावे लागत आहेत. एवढेच नाही तर अनेक अपप्रवृत्ती आता यात घुसल्या आहेत. शेतकऱ्यांना ऊस ठेवणे परवडत नाही म्हणून त्यांनी नवनवे मार्ग अवलंबले आहेत. तरीही यात लूट मात्र शेतकऱ्यांची सुरू आहे. अडचणीत असलेला शेतकरी हतबल आहे, तो प्रचंड संतापलेला असला तरी त्याचा हात दगडाखाली आहे. प्रशासन, सहकार विभाग, साखर संचालक या सर्वानी ही शेतकऱ्यांची लूट थांबवावी.

– विलास बाबर, किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farmers to pay rs 10 to 12 thousand per acre for sugarcane crushing zws

ताज्या बातम्या