scorecardresearch

इंधन दरवाढ शेतकऱ्यांच्या मुळावर! ; शेती मशागतीसाठीच्या खर्चात वाढ

आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनाही इंधन दरवाढीची झळ बसत आहे.

जळगाव : दिवसेंदिवस इंधनाचे दर वाढत जाऊन त्याचे थेट परिणाम सर्वसामान्यांच्या रोजच्या जगण्यावर होऊ लागले आहेत. महागाईचे चटके सहन करावे लागत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळलेल्या शेतकऱ्यांनाही इंधन दरवाढीची झळ बसत आहे. मशागतीसाठी आता यंत्रसामग्री वापरणे परवडणारे नाही. दुसरीकडे ग्रामीण भागात शेती मशागतीची कामे जोरात सुरू झाली असताना मजूर मिळणे कठीण झाले आहे.

मशागतीसाठी पारंपरिक पद्धत जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाकडे शेतकरी वळले आहेत. यामधून मजुरी आणि वेळेची बचत होऊ लागली. मात्र, पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीचे आर्थिक गणित चुकले आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्याने शेती व्यवसाय कसा करावा, अशी चिंता खान्देशातील शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. मशागतीच्या दरात २०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेल यांच्या किमतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील या पदार्थाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारभावातील चढ-उतारानुसार बदलत आहेत. त्याची परिणती महागाईचा आलेख उंचावण्यात झाली आहे. त्याचा फटका शेतकरी वर्गाला बसत आहे.

खरिपात अतिवृष्टीने कापसासह सर्वच पिके धोक्यात आली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला कापूस हिरावला. रब्बीत येणारी पिके आर्थिक पाठबळ देईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र त्यातही अवकाळीने गहू, मका, ज्वारी, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. रब्बीतील गव्हासारख्या पिकातून आर्थिक प्राप्ती होईल, अशी आशा होती. मात्र शेतातील यांत्रिकीकरणामुळे प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. मजुरांच्या समस्येवर यांत्रिकीकरणामुळे काही अंशी तोडगा निघेल व वेळेची बचत होईल असे शेतकऱ्यांना वाटायचे. मात्र उंचावलेले इंधन दर परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून उमटत आहे. त्यामुळे ट्रॅक्टर व कापणी (हार्वेस्टिंग) व्यवसायावर विपरीत परिणाम झाल्याचे चित्र दिसून येत आहे. शिवाय, माल वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे.

यांत्रिकीकरणाची व्यवस्था नसलेल्या शेतकऱ्यांना पीक काढणीसाठी मजुरांची मदत घ्यावी लागते. इंधन, गॅस सिलिंडरसह इतर वस्तूंची महागाई वाढल्याने मजुरीतही भरमसाट वाढ झाली आहे. यंदा एकरी सात ते आठ क्विंटल गव्हाचे उत्पादन झाले.

गव्हाचे दर वाढले असले तरी इंधन दरवाढीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

सध्या शेती मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र, इंधन दरवाढीमुळे मशागतीसाठी ट्रॅक्टरसह इतर यंत्रसामग्री वापरणे परवडत नाही. इंधन दरवाढीने मशागतीचे दरही वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न आहे.

सतिलाल कोळी (शेतकरी, शिंदखेडा)

शेतीच्या मशागतीसह इतर कामांसाठी ट्रॅक्टर वापरला जातो. डिझेलचे दर शंभरीपार गेले आहेत. ट्रॅक्टरची प्रति लिटर सरासरीही कमी असते. इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दरही वाढविणे क्रमप्राप्त ठरले. इंधन दर कधी कमी होतील याकडे लक्ष आहे.

–  विशाल कुंभार (ट्रॅक्टरचालक, जळगाव)

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Farming becomes costlier due to hike in fuel prices in maharashtra zws

ताज्या बातम्या