उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली असताना भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं की, “मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली. त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःखही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले होतं. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल,” असंही ते म्हणाले.