सूर्यग्रहण असल्याने पूजाविधी करताना बाप-लेकाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घाटंजी येथील वाघाडी नदीत ही घटना घडली.

संजय शिवप्रसाद अग्रहारी (वाय ४२) आणि आदित्य संजय अग्रहारी (वय १३) दोघेही रा. शिवाजी चौक, घाटंजी अशी नदीत बुडून मृत्यू पावलेल्या बापलेकाची नावं आहेत. संजय अग्रहारी आणि सुभाष सायरे (वय ४४) यांचे कुटुंब सूर्यग्रहण असल्याने पूजाविधी करण्याकरिता दुपारी वाघाडी नदीच्या पात्राजवळ गेले होते. दोन्ही कुटूंबाची पूजा झाल्यावर आंघोळ करताना संजय अग्रहारी, त्यांचा मुलगा आदित्य, सुभाष सायरे आणि एक लहान मुलगा असे चारजण खोल पाण्यात बुडू लागले.

हे सर्वजण बुडत असल्याचे दिसताच सोबत असणाऱ्या महिलांनी व तिथे उपस्थित असलेल्या भटजीने आरडाओरडा केली. ही आरडाओरड ऐकून एका व्यक्तीने नदीपात्रात उडी घेऊन सुभाष सायरे व लहान मुलाला पाण्याबाहेर काढले. तोपर्यंत संजय आणि आदित्य अग्रहारी या दोघांचाही बुडून मृत्यू झाला होता. दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून ते ग्रामीण रूग्णालयात पाठवण्यात आले. तर, सुभाष सायरे यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घाटंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. या घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी तसेच ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती. बाप-लेकच्या मृत्युमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.