पितृदिनविशेष : १२३ मुला-मुलींची काळजी घेणारा बापमाणूस

१२३ मुला-मुलींच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचे नाव लागते.

संग्रहित छायाचित्र

मोहन अटाळकर

आपले दु:ख मनात लपवून ठेवून दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस म्हणजे वडील. पण, ज्या अनाथ, अपंग, मूकबधीर मुला-मुलींना कधीही वडिलांचे छत्र मिळणे शक्य नव्हते, अशा १२३ मुला-मुलींची काळजी घेण्यासाठी अजूनही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची धावपळ सुरू आहे.

परतवाडा नजीक वझ्झर हे छोटेसे गाव आहे. या गावाबाहेर अनेक टेकडय़ांच्या कुशीत स्व.अंबादासपंत वैद्य मतिमंद, अपंग निराधार मुला-मुलींचा आश्रम आहे. या ठिकाणच्या १२३ मुला-मुलींच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर यांचे नाव लागते. या सर्व मुला-मुलींचे ते पिता आहेत.

या मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्यावरील उपचार आणि त्यांचे विवाह लावून देण्याची जबाबदारी देखील शंकरबाबा यांनीच सांभाळली. आजवर ३० मुला-मुलींचे लग्न करून देताना त्यांच्या योग्य पुनर्वसनाचे यशस्वी ‘मॉडेल’ शंकरबाबा यांनी तयार केले आहे.

यातील काही मुलांना अन्न आणि माती यातील फरक समजत नाही. काही मानसिकदृष्टया विकलांग, काहींना शारीरिक व्याधी आहेत तर काही कायमचे अंध आहेत. या अनाथ मुलांना मायेची पाखर घालणारे शंकरबाबा पापळकर या करोना संकाटाच्या काळातही डगमगून गेले नाहीत.

येथील मुलांची प्रतिकारशक्ती अधिक आहे. ते वनाच्छादित प्रदेशात राहतात. वझ्झर येथे उजाड डोंगर होता. माझ्या मुलांनी तो पाणी देऊन हिरवा केला. त्या हिरवाईने आमची काळजी घेण्याचे ठरविले आहे. उन्हातान्हात रापलेल्या या चिमुकल्यांना समाजाची भक्कम साथ आहे. आम्हाला जपणाऱ्या समाजाची काळजी घेण्याची ही वेळ आहे, असे शंकरबाबा सांगतात.

या मुलांची ते गेल्या दोन तपापासून अहोरात्र सेवा करतात. त्यांचे आरोग्य, शिक्षण आणि एवढेच नव्हे तर वयाची २१ वर्षे झालेल्या या अंध, मुकबधीर तरुण मुलामुलींना नोकरी देऊन त्यांचे संसारही या ‘बाप’ माणसाने स्वबळावर उभे केले आहे. अशाच काही कुटूंबात सुदृढ बालकेसुद्धा जन्माला आली आहेत. शंकरबाबांच्या अंध, अपंग मुलांच्या परिवाराने स्वत:चे जंगल तयार केले आहे. तेच आता त्यांचे जगण्याचे साधन बनले आहे.

या वझ्झरच्या जंगलात कडुनिंब, साग, आवळा, सिताफळ, चिक्कू, करवंद, लिंबू, तेंदू, रक्तचंदन, लवंग, विलायची, इ. फळे देणारी झाडे आहेत. सोबतच अनेक वनौषधीयुक्त झाडांची फुले-फळे विकून अनाथाश्रमाच्या उदरनिवार्हाकरिता उपयोगी ठरत आहे. जंगलातील लहान-मोठया वृक्षांची संपूर्ण निगा वझ्झरच्या आश्रमातील हीच मुले राखतात.याच वृक्षराजीत शंकरबाबा आपल्या चंद्रमोळी झोपडीत राहातात. तेथे बाबांनी हयातीत कबर तयार केली असून तेथे एक फलक झळकतो. त्यावर ‘माझ्या मृत्यूनंतर माझे शरीर या कबरमध्ये माझ्या मतिमंद अनाथ मुलांनी दफन करावे. या कबरीवर सर्व अधिकार माझ्या अनाथ मतिमंद मुलांचा राहील,’असे लिहिले आहे.

१८ वष्रे पूर्ण झालेल्या मुलांना बालगृहात ठेवता येत नाही, असा नियम आहे. परंतु अपंग, मतिमंद, दृष्टिहीन मुले व मुली कुठे जाणार, असा सवाल करून या मुलांच्या पुनर्वसनासाठी सरकारने कायदा करावा, अशी शंकरबाबांची मागणी आहे. त्यासाठी या वडिलांचा लढा सुरू आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Father who takes care of 123 children shankar baba papalkar abn