अहिल्यानगर : मानवी आरोग्यास अपायकारक अशा रसायनयुक्त दूध तयार करून त्याची फक्राबाद (ता. जामखेड) येथील दूध संकलन केंद्रात भेसळ होत असताना अन्न सुरक्षा अधिकारी व पोलिसांच्या पथकाने छापा टाकून तिघांना अटक करण्यात आली. या तिघांकडून एकूण १७ लाख ३२ हजार ८१६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

त्यामध्ये ११९८ लिटर पॅरॅफिन ऑईल, त्याची किंमत २ लाख ३९ हजार रुपये आहे तसेच ३०० किलो वजनाची पांढऱ्या रंगाची पावडर, त्याची किंमत ८१ हजार ५६ रुपये आहे. रसायनांपासून तयार केलेले ३२० लिटर दूध, त्याची किंमत १२ हजार १६० रु., तसेच दोन वाहनांचा जप्त मुद्देमालामध्ये समावेश आहे. समीर कमरूद्दीन शेख (वय ३०, उंबरे, ता. राहुरी, अहिल्यानगर), अफ्ताफ कलीम शेख (वय २८, शुक्लेश्वर चौक, राहुरी) व रामदास नवनाथ उबाळे (वय ४६, फक्राबाद, जामखेड) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

रामदास उबाळे हा हे दूध संकलन केंद्र चालवत होता. कारवाई वेळी तोही तेथे उपस्थित होता. दूध संकलन केंद्रात जप्त करण्यात आलेल्या ११९८ लिटर पॅराफीन केमिकल पासून २४ हजार लिटर दूध तयार होत होणार होते. पॅरॅफिन ऑईल व पांढऱ्या पावडरचा उपयोग कृत्रिमरीत्या दुधाची फॅट व एसएनएफ वाढवण्यासाठी केला जातो. समीर शेख व अफताफ शेख हे दोघे पॅराफीन ऑईल व पांढऱ्या रंगाची पावडर घेऊन फक्राबाद येथील दूध संकलन केंद्रात आले होते. त्याचा वापर रसायनयुक्त दूध तयार करण्यासाठी होत असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले. बडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार कबाडी, अन्न सुरक्षा अधिकारी बडे, उपनिरीक्षक समीर अभंग, अमलदार हृदय घोडके, संतोष खैरे, दीपक काटकर, गणेश लबडे, राहुल द्वारके, लक्ष्मण खोकले, फुरकान शेख, बिराप्पा करमल, शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, राहुल डोके, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

अन्नसुरक्षा अधिकारी रसायनयुक्त दुधाचे तसेच पांढरी पावडर, तेथे तयार केलेले उपलब्ध असलेले दूध याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. पॅरॅफिन ऑइल व पांढऱ्या पावडरचा वापर करून दूध भेसळ केली जात असतानाच पथकाने छापा टाकल्याने मोठा मुद्देमाल हाती लागला आहे.