Tiwari Brothers Kaju Katli FDA Action Mumbai: अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून मुंबईतील हॉटेल व्यावसायिक, दूध डेअरी, मिठाईची दुकाने आणि इतर अन्नपदार्थ विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर लागलीच कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच मुंबईतील एका व्यक्तीने मिठाईच्या दुकानातून खरेदी केलेल्या काजू कतलीच्या तुकड्यात स्टेपलरची गंजलेली पिन आढळल्याची तक्रार केली होती. यानंतर महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने चर्नी रोडवरील प्रसिद्ध तिवारी ब्रदर्स मिठाईवाला दुकानाचा परवाना निलंबित केला आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
शनिवारी १ ऑगस्ट रोजी सदर घटना उघडकीस आली. तक्रारदार प्रणोय पालव यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करत याबाबतची माहिती दिली होती. प्रणोय पालव यांनी पोस्टमध्ये म्हटले की, २९ जुलै रोजी मुंबईतील ऑपेरा हाऊससमोरील तिवारी ब्रदर्स मिठाईवाल्याकडून मी अर्धा किलो काजू कतलीचा बॉक्स घेतला होता. जेव्हा मी त्यातील एक मिठाईचा तुकडा माझ्या ३ वर्षांच्या मुलीला भरवणार होतो. तेव्हा माझी नजर दुसऱ्या एका काजू कतलीवर पडली. लक्षपूर्वक पाहिल्यावर मला त्यात एक गंजलेली धातूची पिन दिसली.
माझ्या मुलीने जर चुकून तो तुकडा खाल्ला असता तर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागू शकले असते, अशी भीती पालव यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली.
तक्रारदार पालव यांनी काजू कतलीचा बॉक्स तिवारी ब्रदर्स मिठाईवाला यांच्या दुकानात नेऊन दाखवत त्याबद्दल जाब विचारला. तसेच याची अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार दिली. दरम्यान यावेळी सदर ग्राहकाने दुकानदाराला जाब विचारल्यानंतर दुकानातील किचनमध्ये मोबाइलने शुटिंगही केले. तेव्हा किचनमध्ये अस्वच्छता असल्याचा दावा तक्रारकर्त्याने या व्हिडीओत केला.
एफडीएच्या छाप्यात काय आढळले?
एफडीएच्या पथकाने सोमवारी तिवारी ब्रदर्स मिठाईवाला या दुकानाची पाहणी केली. या तपासणीदरम्यान स्वच्छतेच्या बाबतीत काही त्रुटी आढळून आल्याचे वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी काजू कतलीचा नमुना प्रयोगशाळेत चाचणीसाठी घेतला आणि तिवारी मिठाईवाला यांचा परवाना निलंबित केला.
द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना एफडीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आम्ही तपासणीसाठी नमुने घेतले असून परवाना निलंबित केला आहे. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, गंजलेली स्टॅपलर पिन मिठाईच्या बॉक्समध्ये कशी आली, याचा निष्कर्ष आताच काढणे घाईचे ठरेल.
अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, हे प्रकरण नेमके काय आहे, हे आताच निश्चितपणे आम्हाला सांगता येणार नाही. कदाचित दुकानदाराला वेठीस धरण्याचाही प्रयत्न असू शकतो. आम्हाला अजून याबद्दल माहिती नाही. मिठाईच्या बॉक्समध्ये गंजलेली स्टेपलर पिन कशी आली, याचा आम्ही शोध घेत आहोत.

दरम्यान सोशल मीडियावर मात्र पालव यांची पोस्ट व्हायरल झाली आहे. अनेक लोकांनी हॉटेल आणि मिठाईच्या दुकानातील स्वच्छता आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच अनेक लोक एफडीएने तात्काळ केलेल्या कारवाईचे कौतुक करत आहेत.
