आपल्या कार्यपद्धतीमुळे देशभरात ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. बीबीसी असो वा जगप्रसिद्ध ‘द न्यूयॉर्क टाइम्स’, मुंढेंच्या कामाचा डंका आंतरराष्ट्रीय पातळीवरही वाजला आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर त्यांचा उल्लेख थेट ‘रॉक स्टार ऑफिसर’ असा केला होता. अशातच प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोएंका यांनी तुकाराम मुंढे यांच्या कामाबद्दल पोस्ट केली आहे. यावर तुकाराम मुंढे यांनी दिलेले उत्तर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मुंढे सध्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत.

हर्ष गोएंका यांची विशेष पोस्ट काय?

आरपीजी ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर तुकाराम मुंढे यांच्यासोबतच्या भेटीचा अनुभव शेअर केला. गोएंका यांनी लिहिले, “मी पहिल्यांदाच तुकाराम मुंढे यांना भेटलो आणि यात शंका नाही की ते या संध्याकाळचे खरे ‘हिरो’ आहेत. प्रत्येक व्यक्तीला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती. याचे कारण अगदी स्पष्ट आहे—सर्वसामान्य नागरिकांना सरकारी अधिकाऱ्यांकडून ज्या अपेक्षा असतात, तेच काम ते प्रत्यक्षात करत आहेत. अन्नातील भेसळ, अस्वच्छ हॉटेल्स आणि बड्या आस्थापनांवर कारवाई करून ते जनतेचे रक्षण करत आहेत.”

‘लोकसेवा ही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते’; तुकाराम मुंढे यांचे उत्तर

हर्ष गोएंका यांच्या या कौतुकानंतर तुकाराम मुंढे यांनी ही पोस्ट री-पोस्ट करत त्यांची भूमिका मांडली.

मुंढे यांनी लिहिले, “लोकसेवा ही कधीही एका व्यक्तीपुरती मर्यादित नसते. प्रामाणिकपणा, धैर्य आणि निष्ठेने नागरिकांची सेवा करण्याची ती एक सामूहिक बांधिलकी असते.”

आपल्या सहकाऱ्यांचे आणि इतर अधिकाऱ्यांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी पुढे म्हटले, “देशभरात असे असंख्य सनदी अधिकारी आहेत जे अतिशय चांगल काम करत आहेत. कदाचित माझ्यापेक्षाही उत्तम काम ते करत असतील, परंतु त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तशी ओळख मिळत नाही. मी तर या मोठ्या उद्दिष्टासाठी एकत्र काम करणाऱ्या पथकाचा एक छोटासा भाग आहे. आम्ही जे काही साध्य करतो, तो नेहमीच सामूहिक प्रयत्नांचा परिणाम असतो.”

“प्रामाणिक आणि उत्तरदायी लोकसेवा हा अपवाद नाही, नियम असावा”

प्रशासकीय व्यवस्थेतील उत्तरदायित्वावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांचा विश्वास आणि त्यांच्या अपेक्षा हीच आमची सर्वात मोठी जबाबदारी आहे. एक प्रामाणिक, उत्तरदायी आणि जनताभिमुख लोकसेवा हा काही अपवाद असायला नको, तर तोच प्रशासनाचा मूलभूत नियम असायला हवा.”