ताट गेले, नंतर वाटीही गेली. पुढे ताटातूटही झाली. ताट-वाटीतले भांडण उपाशीपोटीही सुरू राहिले आणि रुसवाही जाईना. अखेर निवडणुकीच्या हंगामात सहभोजनाचे पर्व सुरू झाले आणि घासा-घासाला खडे लागत असूनही जेवण कसे रुचकर आहे वगैरे दोघेही सांगत आहेत..!
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसअंतर्गत लातूर-नांदेडचे सहमती पर्व सुरू झाले असले, तरी त्यामागील ही पूर्वपीठिका कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला नव्याने फोडणी देणारी ठरली. विलासराव देशमुख यांच्यानंतर अशोक चव्हाण यांच्या गळय़ात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. त्यावेळी बोलताना विलासरावांनी ‘ताटात काय अन् वाटीत काय?’ अशी नेमकी व मार्मिक प्रतिक्रिया व्यक्त केली. चव्हाण यांना मुख्यमंत्रिपदाचे ‘ताट’ मिळाल्यानंतर देशमुखांचे बंधू दिलीपराव यांना मंत्रिपदाची ‘वाटी’ मिळाली. पण या वाटीवर लातूरकर खूश होते. मात्र, आयुक्तालयाचा वाद सुरू करून चव्हाण यांनी लातूरकरांचा रोष ओढवून घेतला.
कालांतराने चव्हाणांचे ताट गेले अन् दिलीपरावांची वाटीही. नांदेड व लातूरची ताटातूट झाली. दोघांचेही उपाशीपोटीचे भांडण दीर्घकाळ सुरू राहिले. दरम्यानच्या काळात विलासरावांचे अकाली निधन झाले, तरीही चव्हाणांचा लातूरवरील रुसवा टिकून होता. मात्र, लोकसभा निवडणुकीमुळे आमदार अमित देशमुख यांनी पुढाकार घेत सहमतीचे राजकारण सुरू केले. त्याला अपेक्षित प्रतिसाद देताना लातूर-नांदेडचे नाते अतुट असल्याचे चव्हाण यांनीही जाहीर केले. मात्र, ताट-वाटी हरवल्यानंतर आता सहभोजनाची तयारी सुरू झाली आहे. सहभोजनात घासा-घासाला खडे लागत असले, तरी जेवण कसे रुचकर झाले, असे दोघेही एकमेकांना सांगत आहेत.
‘मान सांगावा जना अन् अपमान सांगावा मना’ हे लक्षात घेऊन चेहऱ्यावर लटकेच हास्य आणून दोघेही एकमेकांना सांभाळून घेत आहेत. आधी दूध पोळल्याचा अनुभव घेतल्यामुळे ताकही फुंकून पिण्याची काळजी दोघांकडून आवर्जून घेतली जात आहे. मोदी यांच्या प्रचाराच्या प्रभावात टिकून राहण्यासाठी लातूर-नांदेडचा तूर्त समेट झाला आहे. निवडणुकीत सहमतीची गाडी धावू लागली असली, तरी निवडणुकीनंतर पुन्हा ताट-वाटी मिळेल की हातात वाडगा, हे मात्र मतदारच ठरवतील!