सांगली : मुंबईतील डॉक्टर महिलेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आत्महत्या करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. डॉ. शुभांगी समीर वानखेडे (वय ४४, रा. मुलुंड पश्चिम, ग्रेटर मुंबई) असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे.इस्लामपूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाळवा तालुक्यात विठ्ठलवाडी गावच्या हद्दीत मोटारीत एक महिला गंभीर जखमी स्थितीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीनुसार सहायक पोलीस फौजदार संदीप यादव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता मोटारीत मागील बाजूस एक महिला बेशुद्धावस्थेत आढळून आली. पोलिसांनी उपचारासाठी इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र,उपचार सुरू होण्यापूर्वीच त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
डॉ. शुभांगी वानखेडे यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधला असता त्या सकाळीच मोटारीतून (एमएच ०३ एआर १८९६) कामावर जाते असे सांगून निघाल्या होत्या. पुणे-बंगळुरू महामार्गावर आल्यानंतर त्यांनी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोटार थांबवून हात व गळ्यावर ब्लेडने काप घेतले. यानंतर त्या बेशुद्ध झाल्या असाव्यात असा पोलिसांचा अंदाज आहे.
मोटारीत मिळालेल्या त्यांच्या ओळखपत्रावरून जखमी महिला डॉ. शुभांगी वानखेडे असल्याचे समोर आले. पोलिसांनी ओळखपत्रावरून नातेवाइकांशी संपर्क साधून ही माहिती दिली. शवविच्छेदनानंतर त्यांचे पार्थिव नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेनंतर उपअधीक्षक विपुल पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्या गेले काही दिवस तणावात असल्याची माहिती समोर आली असून घरात किरकोळ वादही झाला होता, असे समजते.