खळबळजनक! कालव्यात आढळून आला पट्टेदार वाघीण शावकचा मृतदेह

सेलु तालुक्यातील केळझर येथील घटना

कालव्यात आढळून आलेला मृतदेह.

सेलु तालुक्यातील केळझर येथील जंगल कामगार सोसायटीच्या शेताजवळून वाहत असलेल्या मुख्य कालव्याच्या पाण्यात पट्टेदार वाघिणीचा मृतदेह आढळून आला आहे. कालव्याच्या पाण्यात मृतदहे पडून असल्याचे सोसायटीतील वीटभट्टीवर काम करणाऱ्या शुभम विष्णू रघाटाटे याच्या निदर्शनास आले. त्याने गावातील नागरिकांना याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच केळझर वनक्षेत्र सहाय्यक नंदकिशोर पाचपोर व कर्मचारी हे घटनास्थळी पोहोचले. सदर घटना ही आज (२१ मार्च) सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. मृत्यूचे खरे कारण हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच समोर येईल, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

आज जिल्ह्यात ३६ तासाची संचारबंदी असल्याने बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे कामं ठप्प असल्यानं लोकंही घरीच आहेत. याच काळात शुभम रघाटाटे हा नेहमीप्रमाणे आज सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान कामगार सोसायटीमधील विटभट्टीवर कामावर जात होता. त्याला पीरबाबा टेकडीजवळील मुख्य कालव्यात वाघ पडून असल्याचे दुरुन दिसून आले. परंतु वाघ कोणत्याही प्रकारची हालचाल करत नसल्याचं त्याच्या निदर्शनास आलं. वाघ मृतावस्थेत पडून असल्याची खात्री झाल्यानंतर त्याने याची माहिती ग्रामस्थांना दिली. सदर वार्ता गावात व परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गावातील प्रत्येकजण पीरबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या कालव्याचे दिशेने धावत सुटला. पाहता पाहता घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. त्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मादी वाघ शावक दीड ते दोन वर्षाची आहे. वाघिणीच्या उजव्या बाजूच्या मागच्या व पुढच्या पायावर तसेच पुठ्ठ्यावर एक खरचटल्याची खुण दिसून आली. परंतु शरीराचे अवयव व्यवस्थित असल्याचं दिसून आलं. यावेळी मृत शावक वाघिणीचे वजन घेतले असता ते ५७ किलो भरले. घटनास्थळी नागपुर वन विभागाचे विभागीय अधिकारी एस.के.त्रिपाठी, प्रभारी उपवनसंरक्षक डॉ. मयूर पावसे तुषार डमडेरे, वर्धा बोर व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.आर.गावंडे, न्यू बोर वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड, हिंगणी वन परिक्षेत्र अधिकारी रिता वैद्य, संजय इंगळे तिगावकर व कौशल मिश्रा (मानज वन्यजीव रक्षक,वर्धा) यांनी भेट दिली. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रकाश भिसेकर व डॉ. मीना काळे व प्रणिता पाणतावणे यांनी वाघिणीचे शवविच्छेदन केलं. अहवाल आल्यानंत वाघिणीच्या मृत्यूचं कारण समोर येऊ शकतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Female tiger dead body found in canal bmh