करोनाचा प्रादूर्भाव वाढल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक परप्रांतीय मजूर गावी परतल्यामुळे कोकण रेल्वेने रत्नागिरीत आलेले खत उतरवण्यास हमालांची उणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी आवश्यक  खते पाठवण्यात उशीर होत असल्याची माहिती पुढे आली आहे.

समाधानकारक पाऊस सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील भात पेरणीची कामे वेगाने सुरु आहेत. मात्र खताचा पुरेसा पुरवठा झालेला नसल्याने शेतकऱ्यांची पंचाईत झाली आहे. करोनामुळे टाळेबंदीच्या काळात शेतकऱ्यांना बांधावर जाऊन खते, बियाणे उपलब्ध करुन द्या, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या; मात्र रत्नागिरीत अजूनही परिस्थिती गंभीर असून कृषी विभागाकडून यावर उपाययोजना करण्यात यश आलेले नाही.

मोसमी पाऊस सुरु झाला की भात पेरणीची कामे वेगाने होतात. यंदा हा पाऊ स वेळेवर सुरू झाला आहे. जिल्ह्यात भात शेतीचे क्षेत्र ६७ हजार हेक्टर असून १० ते १२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली जाते. पेरणीनंतर रोपे व्यवस्थित रुजून यावीत यासाठी युरिया आणि सुफला रासायनिक खते दिली जातात. आतापर्यंत जिल्ह्यातील पेरणीची सुमारे ६० टक्केहून अधिक कामे पूर्ण झाली आहेत. तरीही खताचा पत्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातून खताची मागणी वेळेत करण्यात आली होती. मात्र त्याच वेळी करोनाने जिल्ह्यात पाय पसरायला सुरुवात केली  होती. काम नसल्यामुळं बहुतांशी परराज्यातील कामगार गावी परतले. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी या कामगारांअभावी कामे रखडली आहेत. तुर्भे येथून रत्नागिरी जिल्ह्यात युरिया आणि सुफला ही खते कोकण रेल्वेने आणली जातात. पहिल्यांदा दोन मालगाडय़ातून सुमारे साडेचार हजार टन खत दाखल झाले. ते खत उतरवण्यासाठी मंजूर उपलब्ध नव्हते.  त्यामुळे गाडी बराच काळ रेल्वे स्थानकात उभी राहिली.  त्याचा भूर्दंड आरसीएफ कंपनीला बसला. रेल्वेला दंडाची रक्कम भरावी लागली.  त्यामुळे तिसरी गाडी पाठवण्यापूर्वी मजूर उपलब्ध करून ठेवावे, अशी सूचना कंपनीने कृषी विभागाला केली होती. मात्र मजूर शोधण्यात सुमारे एक आठवडा गेला.  तोपर्यत भात लावणी सुरु झाली होती.  शेती सुरु झाली पण खत नसल्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. मंगळवारी १३०० मेट्रिक टन खत आले. ते उतरवण्यासाठी रत्नागिरीच्या तहसीलदारांनी  मजुरांची व्यवस्था केली होती. सध्या शंभर मजूर रेल्वे स्थानकात उपलब्ध आहेत. आलेले खत तालुक्यात पाठवण्यात आले आहे. परंतु मागणीच्या तुलनेत खत कमी असल्यामुळे शेतकरी दुकानात गर्दी करु लागले आहेत. अशी परिस्थिती संगमेश्वर येथे दिसून आली.

मजूर नसल्याने खताची रेल्वे गाडी आली नव्हती. पण आता  या समस्येवर तोडगा काढण्यात आला असून जिल्ह्यामध्ये येत्या काही दिवसांत खताचा पुरवठा सुरळीत होईल.

– शिवराज घोरपडे, जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी