सिया गोयल या तरुणीने तिचा होणारा नवरा केतन अग्रवालला लोहगडावरुन दरीत ढकललं आणि त्याची हत्या केली. या घटनेने पुणे शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. सियाने केतन अग्रवाल हा पाय घसरुन दरीत पडला असा बनाव रचला होता. मात्र केतन हा चांगला ट्रेकर होता असं त्याच्या कुटुंबाने सांगितलं आणि सियावर संशय व्यक्त केला. या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पोलिसांना हे कळलं की सियानेच त्याला धक्का दिला आणि त्याची हत्या केली. या प्रकरणात विविध प्रकारचे खुलासे होत आहेत. सियाने १८ जूनला त्याला धक्का दिला आणि मारलं त्याचा मृतदेह पोलिसांना लोहगडाच्या पश्चिम भागातल्या दरीत आढळून आला. आता अशी माहिती समोर आली आहे की सिया गोयलने १४ जून रोजीही केतनला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनीच ही माहिती दिली.

केतन अग्रवालचे वडील विशाल अग्रवाल यांनी काय सांगितलं?

२६ वर्षीय केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लग्न ठरलं होतं. मात्र केतनची हत्या सियानेच केली. याबाबत केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले १४ जून रोजी सिया केतनला घेऊन लोहगडावर गेली होती. तिथे तिने त्याला धक्का देऊन दरीत ढकलण्याचा प्रयत्न केला. पण केतन झुडुपांमध्ये अडकला आणि वाचला, आपला प्रयत्न फसला आहे हे सियाला लक्षात आलं ज्यानंतर ती लगेच साप आला असं ओरडत केतनच्या जवळ गेली आणि तिने त्याला मिठी मारली. एवढंच नाही तर सिया आणि केतन हे प्री वेडिंग शूटसाठी बाली या ठिकाणी जाणार होते पण जेव्हा ते विमानतळावर गेले तेव्हा लक्षात आलं की केतनचा पासपोर्ट सापडत नाही. हा पासपोर्टही सियानेच चोरला होता. केतनचा पासपोर्ट कुठेतरी पडला असा बनाव सियाने केला. तसंच शोधाशोध करायचं नाटकही केलं. पण तो सापडला नाही त्यामुळे बालीची त्यांची ट्रीप रद्द झाली. त्यानंतर या दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाला आणि तुला माझ्याबरोबर लोहगडावर यावंच लागेल असं सियाने केतनला बजावलं होतं. त्यामुळे केतन तिच्याबरोबर परत लोहगडावर गेला असं विशाल अग्रवाल यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

१८ जूनला नेमकं काय घडलं?

१८ जूनला सिया गोयल आणि केतन अग्रवाल हे दोघंही लोहगडावर फिरायला गेले. लोहगडावरुन सेल्फी घेत असताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत पडला अशी माहिती सियाने अग्रवाल कुटुंबाला दिली. त्यानंतर लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि केतनचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी लोहगड किल्ल्याच्या पश्चिम भागात असलेल्या दरीत केतनचा मृतदेह पोलिसांना सापडला. केतनला ट्रेकिंगची आवड होती त्यामुळे तो पडला कसा? याबाबत अग्रवाल कुटुंबाला संशय होता, पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर पोलिसांनी हा पैलू लक्षात घेत तपास सुरु केला आणि केतनचा अपघाती मृत्यू नाही तर हत्या झाल्याची बाब समोर आली. सियानेच हा सगळा कट चेतनशी म्हणजेच तिच्या प्रियकराशी संगनमत करुन रचला होता असंही समोर आलं.

Ketan Agrwal Murder Case
केतन अग्रवाल या तरुणाला त्याच्या होणाऱ्या पत्नीने म्हणजेच सिया गोयलने लोहगडावरुन धक्का दिला आणि ठार केलं. (फोटो-सोशल मीडिया)

केतन अग्रवाल हत्या प्रकरणातले काही ठळक मुद्दे

१) १८ जून रोजी केतनला जेव्हा सियाने ढकललं तेव्हा तो जवळपास ४०० फूट खाली दरीत कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.

२) सियाने केतनच्या कुटुंबाला हे सांगितलं की केतन सेल्फी घेताना दरीत कोसळला.

३) केतनच्या कुटुंबाने पोलिसांना तातडीने याबाबत सूचना दिली. पोलीस घटना स्थळी पोहचले तेव्हा शोध घेताना लोहगडाच्या पश्चिमेला पोलिसांना दरीत केतनचा मृतदेह आढळून आला.

४) प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी केतन अग्रवालच्या अपघाती मृत्यूची नोंद केली. पण नंतर या घटनेमागे संशयास्पद पैलू असल्याचं पोलिसांना लक्षात आलं.

५) पोलिसांनी सगळा घटनाक्रम तपासला तेव्हा त्यांच्या हे लक्षात आलं की सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनीच कट रचून केतनला ठार केलं आहे. ज्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.

६) सिया गोयलने तीन ते चार वेळा केतनला ठार करण्याचा प्रयत्न केला होता. तिचा १८ जूनचा प्रयत्न यशस्वी झाला असा आरोप अग्रवाल कुटुंबाने केला आहे.

पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी काय सांगितलं?

पुणे ग्रामीण विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितलं की केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाचे विविध पैलू तपासात समोर आले त्यामुळे आम्हाला हा अपघाती मृत्यू नसून हत्या असल्याचं लक्षात आलं. सिया गोयल आणि चेतन चौधरी यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात केतन अडथळा ठरेल म्हणूनच या दोघांनी कट रचून त्याला ठार केलं. फिरायला जाण्याच्या बहाण्याने सियाने केतनला लोहगडावर नेलं. त्या ठिकाणी चेतन चौधरीला सियाने फोन करुन बोलवून घेतलं. यानंतर या दोघांनी केतन अग्रवालला धक्का दिला आणि तो दरीत कोसळला. पोलिसांनी या दोघांनीही अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.