scorecardresearch

१४ लाखांची ३२ ‘फायबर टॉयलेट’ महापालिकेमध्ये धूळ खात पडून; सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था; महिलांचीही कुचंबणा

शहरात महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली असताना आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने त्यांना कुचंबणा सहन करावी लागत आहे.

नगर : शहरात महापालिकेच्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली असताना आणि महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने त्यांना कुचंबणा सहन करावी लागत आहे. मात्र, दुसरीकडे महापालिकेने सुमारे १४ लाख रुपयांची खरेदी केलेली ३२ फायबरची स्वच्छतागृहे (टॉयलेट) महापालिकेच्या आवारात धूळ खात पडून आहेत. ही नवीन खरेदी केलेली ‘फायबर टॉयलेट’कोठे बसवायची याची ठिकाणेही मनपा प्रशासनाने निश्चित केलेली नाहीत.

महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार शहरात ३२ स्वच्छतागृहे आहेत. तेथे ४०० हून अधिक संख्येत सार्वजनिक मुतारी व स्वच्छालय अशा दोन्हींची व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ रामवाडी येथील एक स्वच्छतागृह बंद आहे तर अमरधामजवळील झारेकर गल्लीलगतचे स्वच्छतागृह रात्रीतून पाडले गेले. ते कोणी पाडले याचा शोध अद्याप लागलेला नाही.

मात्र मनपाच्या माहितीपेक्षा वस्तुस्थिती वेगळीच आहे. बहुसंख्य ठिकाणच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याने ती वापरात नाहीत किंवा दुर्गंधीमुळे नागरिक तेथे जाण्याचे टाळतात. या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी मनपाने तेथे ३० हून अधिक सफाई कर्मचारी नियुक्त केले असूनही स्वच्छतेअभावी नागरिक त्याचा वापर करणे टाळतात. विशेष म्हणजे शहरातील बाजारपेठेत एकही स्वच्छतागृह नाही. विशेषत: महिलांची त्यामुळे मोठीच कुचंबणा होते.

मनपाच्या महिला व बालकल्याण विभागाने गेल्या वर्षीच्या निधीतून सुमारे १४ लाख रुपये खर्चून ३२ ‘फायबर टॉयलेट’ खरेदी केले. त्यासाठी पुण्यातील ठेकेदाराला पुरवठा आदेश दिला होता. त्यांनी ‘फायबर टॉयलेट’ मनपाला पोहोच केले. त्यानुसार मनपा मुख्यालयाच्या आवारात १२, अमरधाममध्ये १२, गंगा उद्यानात २, व साई उद्यानात ६ फायबर टॉयलेट ठेवले गेले आहेत.

‘फायबर टॉयलेट’वर २०० लिटर क्षमतेची पाण्याची टाकीही बसविली जाणार आहे. मात्र हे ‘फायबर टॉयलेट’ ज्या ठिकाणी बसवले जाणार आहेत तिथे मूत्राची विल्हेवाट लावण्यासाठी ड्रेनेज असण्याची आवश्यकता आहे. अशी ठिकाणे मनपा प्रशासनाने अद्याप निश्चित केली नसल्याने ती कोठे बसवावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.  शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची जबाबदारी मनपाने घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सोपवली आहे. मात्र महिला व बालकल्याण विभागाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेले ‘फायबर टॉयलेट’  बसवण्याची जबाबदारी उद्यान विभागावर टाकण्यात आली आहे. उद्यान विभागाने वरिष्ठांकडेही ‘फायबर टॉयलेट’ बसवण्यासाठी ठिकाणे निश्चित करण्याची मागणी केली. मात्र त्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे ही ‘फायबर टॉयलेट’ सध्या धूळ खात पडून आहेत.

अंमलबजावणी का नाही? याची विचारणा करू – उपमहापौर

यासंदर्भात उपमहापौर गणेश भोसले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी ३२ फायबर टॉयलेटह्ण मनपाच्या आवारात पडून असल्याचे लक्षात आल्यानंतर आपण प्रशासनाचे लक्ष वेधले होते. काही ठिकाणेही निश्चित करून देण्यात आली होती. मात्र त्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. यासंदर्भात आपण प्रशासनाकडे विचारणा करू, असे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fiber toilets nmc poor condition public toilets womens infatuation ysh