पंढरपूरजवळ भीमा नदीत होडी उलटून घडलेल्या दुर्घटनेत पाच महिलांना मिळालेल्या जलसमाधीप्रकरणी होडीमालकाविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. होडी बुडाल्यानंतर सुरुवातीला दोन महिलांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर घेतलेल्या शोधकार्यात आणखी तीन महिलांचे मृतदेह सापडले.
 अंबूबाई यल्लप्पा वाघमोडे (४०), तिची मुलगी सुरेखा यल्लप्पा वाघमोडे (१५), सोनाली रामचंद्र वाघमोडे (९), सीताबाई अंबादास वाघमोडे (३५, सर्व रा. पळशी, ता. पंढरपूर) व संगीता मारुती पवार (३५, रा. वाखरी, ता. पंढरपूर) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेप्रकरणी यंकू यल्लप्पा वाघमोडे (रा. पळशी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार होडीचालक व मालक बापू मनोहर नगरे (रा. कवठाळी, ता. पंढरपूर) यांच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरपूर तालुक्यातील व्होळे येथे हनुमान यात्रेनिमित्त पळशी व परिसरातील नंदीबैलवाले समाजातील स्त्री-पुरुष भाविक कवठाळी येथून होडीत बसून भीमा नदी ओलांडत व्होळे येथे गेले होते. सायंकाळी यात्रा संपवून परत येताना या भाविकांनी पुन्हा होडीचा आधार घेतला. होडीत १७ महिला व एक पुरुष होता. परंतु नदीच्या पात्रात पाण्याची खोली जास्त असतानाच अचानकपणे होडी पालथी होऊन त्यातील पाच महिला पाण्यात बुडाल्या. यात प्रारंभी दोन महिलांचे मृतदेह सापडले, तर अन्य तीन महिलांचे मृतदेह रात्री उशिरा हाती लागले.
भीमा नदीच्या एका बाजूला कवठाळी तर दुसऱ्या बाजूला व्होळे गाव आहे. या दोन्ही गावांतून एकमेकांकडे येण्या-जाण्यासाठी नदीतून होडीत बसून प्रवास करावा लागतो. होडी प्रवास हा नित्याचा आहे. तथापि, या दुर्घटनेतील होडीमालक व चालक बापू नगरे याच्याकडे होडी चालविण्याचा कोणताही परवाना नव्हता. तसेच होडीत बसल्यानंतर आवश्यक सुरक्षेची कोणताही साधने नव्हती. यातच क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना प्रत्येकी दहा रुपये प्रवास भाडे घेऊन होडीत बसविण्यात आले होते. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.