मुंबई: फिफा विश्वचषक फुटबॉल महामुकाबला आज मध्यरात्री रंगणार आहे. विजेतेपदासाठी मेसीचा अर्जेंटिना आणि स्पेन आमनेसामने असून अवघ्या काही तासांत रणसंग्राम सुरू होणार आहे. फुटबॉल जगतातील सर्वात मोठा आणि मानाचा सोहळा म्हणजेच ‘फिफा विश्वचषक २०२६’ (FIFA World Cup 2026) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आज रात्री अमेरिकेच्या ऐतिहासिक न्यू यॉर्क न्यू जर्सी (मेटलाईफ) स्टेडियमवर डिफेंडिंग चॅम्पियन अर्जेंटिना (Argentina) आणि युरोपियन बलाढ्य स्पेन (Spain) यांच्यात विजेतेपदासाठी अंतिम सामना रंगणार आहे.
मेसी विरुद्ध लामीन यमाल: अनुभव आणि तरुण रक्ताचा सामनाया अंतिम सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे, कारण हा सामना फुटबॉलचा महानायक लिओनेल मेसी (Lionel Messi) आणि स्पेनचा युवा सनसनाटी खेळाडू लामीन यमाल (Lamine Yamal) यांच्यातील थेट लढत मानला जात आहे. अर्जेंटिनाने उपांत्य फेरीत इंग्लंडचा २-१ ने पराभव करून सलग दुसऱ्यांदा फायनल गाठली आहे, तर स्पेनने फ्रान्सला २-० ने धूळ चारात दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
फिफा वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्याचा थरार अनुभवण्यासाठी आणि फुटबॉल प्रेमींसाठी राज्यातील खाद्यगृहे, हॉटेल व रेस्टॉरंट उद्या रोजीच्या पहाटे ०४.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.त्यानुसार राष्ट्रीय रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, मुंबई यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३३ मधील तरतुदीनुसार राज्यातील खाद्यगृहे, हॉटेल व रेस्टॉरंट या आस्थापनाधारकांना पहाटे ०४.०० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आस्थापनाधारकाने आस्थापनेच्या आतील व बाहेरील बाजूस मुबलक प्रमाणामध्ये खाजगी सुरक्षा रक्षक तैनात करुन, सदर जागी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.
आस्थापनेच्या आतील बाजूस अथवा बाहेर कोणताही अनुचित प्रकार/गुन्हा घडल्यास व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, त्याची संपूर्ण जबाबदारी आस्थापनाधारकावर राहील. त्याप्रमाणे आस्थापनाधारक / परवानाधारक हे कारवाईस पात्र राहतील.
वेळेच्या संदर्भामधील शिथिलता ही जागेच्या परवान्याकरीता देण्यात येत आहे. परंतु ध्वनीक्षेपण कायदा व नियमांचे पालन करणे आस्थापनाधारकास बंधनकारक राहील. तसेच, याबाबत मा. सर्वोच्च/उच्च न्यायालयाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करावा.
वरीलप्रमाणे वाढीव वेळेची परवानगी, फक्त बंदिस्त जागेतील/इमारतीमधील आस्थापनांनाच देण्यात येत आहे. सार्वजनिक शांतता तसेच, कायदा व सुव्यवस्था यांचा विचार करुन, योग्य वाटल्यास आवश्यकतेनुसार वरीलप्रमाणे वेळेच्या बंधनामधील शिथिलता नाकारण्याचे अधिकार स्थानिक पोलीस प्रशासनास राहतील असे आदेश गृह विभागाने दिले आहेत.
