पुणे : कोकण विभाग आणि पश्चिम महाराष्ट्र वगळता राज्यात बहुतांश ठिकाणी ऑगस्टमध्ये मोठा पाऊस झाला नाही. त्यामुळे राज्यातील पंधरा जिल्ह्य़ांत सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली. मुंबईला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांसह राज्यातील जलाशयांतील पाणीसाठय़ात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे.

राज्यातील सर्व धरणांमध्ये गेल्या वर्षी याच कालावधीत एकूण सुमारे ७४ टक्के पाणीसाठा होता. तो सध्या ६० टक्क्य़ांवर आहे. मुंबईला पाणीपुरठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा सुमारे सात टक्क्यांनी कमी आहे. यंदा मुंबईत जून आणि जुलै महिन्यातील काही ठरावीक दिवशी तीव्र मुसळधार पाऊस झाल्याने पावसाने ३ महिन्यांची सरासरी ओलांडली. मात्र, गेल्या (पान २ वर) (पान १ वरून) काही दिवसांपासून तलावक्षेत्रांमध्ये कमी पाऊस पडत असल्याने तलावांतील साठा संथगतीने वाढत आहे. मात्र, सातपैकी तानसा, मोडकसागर, विहार आणि तुळशी हे चारही तलाव ओसंडून वाहू लागले असून, उर्वरित तलाव लवकरच भरून वाहतील, असा विश्वास पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

मोसमी पावसाच्या हंगामात सुरुवातीच्या दोन महिन्यांमध्ये राज्यात बहुतांश भागांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला, तरी उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत सुरुवातीपासून पावसाचे प्रमाण कमी आहे. या कालावधीत कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत मोठय़ा पावसाची नोंद झाली. ऑगस्ट महिन्यात राज्यात पावसाचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, पावसाचे असमान वितरण या महिन्यातही दिसून आले. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील घाट विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मात्र, उत्तर महाराष्ट्रातील पाऊस या महिन्यातही कमीच नोंदला गेला. विदर्भातील तब्बल नऊ जिल्ह्य़ांमध्येही पाऊस कमी झाला. कोकण विभाग आणि मराठवाडय़ातील प्रत्येकी एक जिल्हाही पावसात उणा आहे. त्यामुळे ऑगस्टच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत राज्यातील एकूण १५ जिल्हे पावसाची सरासरी पूर्ण करू शकले नाहीत.

पावसाने ओढ दिल्याचा परिणाम राज्यातील पाणीसाठय़ावरही झालेला दिसून येत आहे. राज्यातील सर्व प्रकल्पांतील एकूण साठा गतवर्षीच्या तुलनेत १४ टक्क्य़ांनी कमी आहे. अमरावती, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद विभागांमध्ये पाण्याबाबत चिंता वाढत आहे. मराठवाडय़ात हिंगोली वगळता इतर सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाने सरासरी पूर्ण केली असली, तरी विभागातील धरणांमध्ये मात्र गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी पाणीसाठा कमी आहे. त्यातील सर्वाधिक चिंताजनक स्थिती जायकवाडी (पैठण) प्रकल्पाबाबत आहे. मराठवाडय़ाच्या पाण्याचा मुख्य आधार असलेल्या या प्रकल्पात गतवर्षी याच कालावधीत ८० टक्क्य़ांहून अधिक पाणीसाठा होता. तो सध्या ४१ टक्क्य़ांवर आहे. नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. या भागांतूनच गोदावरीच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर पाणीसाठा जायकवाडीत जात असतो. मात्र, सध्या याच भागात पाणीसाठा कमी आहे. नाशिक विभागात गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्य़ांनी पाणीसाठा कमी आहे.

ऑगस्टअखेपर्यंत पावसाची पाठ?

राज्यात सर्वच ठिकाणी सध्या पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन ते सरासरीपुढे गेले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी चार ते पाच दिवस तरी राज्यात कुठेही मोठय़ा पावसाची शक्यता नाही. पावसाला पोषक स्थितीचे संकेत सध्या कुठेही नाहीत.

सात टक्के कमी

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये बुधवारी, २५ ऑगस्टला १२ लाख ७३ हजार ०३९ दशलक्ष लिटर पाणीसाठा होता. हे प्रमाण ८७.९६ टक्के आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा पाणीसाठा १३ लाख ६८ हजार ६११ दशलक्ष लिटर म्हणजे ९४.५६ टक्के होता.

विभागवार पाणीसाठा

विभाग                  गतवर्षी          सध्या

अमरावती         ७०.२२ टक्के      ५८.३ टक्के

औरंगाबाद       ६०.५६ टक्के        ४०.४९ टक्के

कोकण            ८१.१६ टक्के       ७९.४८ टक्के

नागपूर             ७१.१८ टक्के      ४८.१ टक्के

नाशिक           ६९.८६ टक्के         ४९.१६ टक्के

पुणे                  ८१.८ टक्के          ७३.५ टक्के