जि. प.तील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीपासून जिल्ह्यात शिवसेनेअंतर्गत उफाळलेल्या गटबाजीने शनिवारी मुद्दय़ावरून गुद्दय़ावरचे वळण घेतले. सेनेच्या वतीने वसमत येथे आयोजित मेळाव्यात नवीन संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या साक्षीने माजी खासदार सुभाष वानखेडे व माजी मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा यांच्या समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या वेळी झालेल्या दगडफेकीत जि. प. सदस्य व इतर कार्यकर्ते जखमी झाले. मेळाव्याचा हा बदललेला नूर पाहून अनेकांनी पळ काढला. विशेष म्हणजे या मेळाव्याकडे वानखेडे व मुंदडा या दोघांनीही पाठ फिरविली.
हिंगोली जि. प.ची सत्ता सेनेकडे एक हाती आली असली, तरी सत्ता स्थापन केल्यापासूनच जिल्ह्य़ात सेनेअंतर्गत दोन गट सक्रिय झाले आहेत. या गटबाजीतूनच लोकसभेच्या निवडणुकीत सेनेचे उमेदवार माजी खासदार वानखेडे यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, या पराभवातूनच सेनेतील गटबाजी अधिक टोकदार होत गेली. नवीन जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या उपस्थितीत शनिवारी वसमतला सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यातच वानखेडे व मुंदडा समर्थकांत हाणामारी झाली. अॅड. शिवाजीराव जाधव व सोपानराव नादरे हे सेनेत अधिकृत प्रवेश न करताच व्यासपीठावर कसे आले, यावरून दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध घोषणाबाजी सुरू केली. त्यातून वाद चिघळला. हाणामारीत जि. प.चे गटनेते अनिल कदम, सोपान कऱ्हाळे यांच्यासह इतरही जखमी झाले. जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांच्या वाहनाची तोडफोड झाली. मेळाव्याचा हिंस्त्र पवित्रा पाहून अॅड. जाधव यांच्यासह इतर नेत्यांनी पळ काढला. व्यासपीठावरील साहित्याची मोठी तोडफोड झाली.
नवनियुक्त संपर्कप्रमुख जाधव यांच्या उपस्थितीत शुक्रवारी व शनिवारी कळमनुरी, िहगोली, वसमत येथे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या दोन दिवसांत संपर्कप्रमुखांच्या आगमनानिमित्त ठिकठिकाणी लावलेल्या स्वागत फलकावर वानखेडे गटाकडून मुंदडा व माजी आमदार गजानन घुगे यांचे छायाचित्र कटाक्षाने टाळण्यात आले. मुंदडा, घुगे समर्थकांकडून जिल्हाप्रमुख बांगर व वानखेडे यांचे छायाचित्र जाहिरात व स्वागत फलकातून वगळले. यातून गटबाजीचे जाहीर प्रदर्शन घडले.
शनिवारी वसमत येथे मेळाव्यात व्यासपीठावर सेनेत अधिकृत प्रवेश न घेतलेल्या सोपानराव नादरे, अॅड. शिवाजीराव जाधव यांच्यासह जिल्हाप्रमुख बांगर हे वानखेडे समर्थक उपस्थित होते. मेळावा सुरू होताच वानखेडे समर्थकांकडून शिवाजीराव जाधव आगे बढो अशा घोषणा होऊ लागल्या. त्यास मुंदडा समर्थकांनी डॉ. मुंदडा आगे बढो या घोषणेने प्रत्युत्तर दिले. दोन गटांच्या घोषणाबाजीने या वेळी गोंधळ उडाला.
बांगर यांनी घोषणाबाजी थांबविण्याचे आवाहन करताच दोन्ही समर्थकांनी साहित्याची फेकाफेक सुरू केली. भिरकावलेले काही दगड व्यासपीठाकडे येताच अॅड. जाधव, नादरे यांनी पळ काढला. बांगर यांनी संपर्कप्रमुख जाधव यांना सुखरूप बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, बांगर यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत जि. प.चे गटनेते अनिल कदम यांच्यासह काही कार्यकत्रे जखमी झाले. कदम यांना उपचारासाठी त्यांच्या समर्थकांनी रुग्णालयात हलविले.
शिवराळपणा!
गोंधळात व्यासपीठावरील बॅनर फाडणे, खुच्र्या-पंख्याची तोडफोड तर झालीच; पण छत्रपती शिवरायांचा पुतळाही खाली पडला. हाणामारीनंतर उशिरापर्यंत पोलिसांत कोणत्याही गटाची तक्रार गेली नव्हती.