हर्षद कशाळकर

अलिबाग : रायगड जिल्हा म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हे एकेकाळी समीकरण होते. प्रभाकर पाटील, दि. बा. पाटील, दत्ता पाटील, दत्तूशेठ पाटील अशी दिग्गजांची पक्षात फौज होती. याच शेकापला आता जिल्ह्यात अस्तित्वाची लढाई करावी लागत आहे.  विधानसभा निवडणूकीत झालेला मानहानीकारक पराभव, जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचे वाढणारे प्रस्त, आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आलेला दुरावा या पार्श्वभूमीवर शेतकरी कामगार पक्षासमोर जिल्हा परिषदेवर वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान असणार आहे.  

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Srikala Reddy Singh and her husband Dhananjay Singh
नवरा तुरुंगात, बायको निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत श्रीकला रेड्डी?
satej patil , raju shetty
साखरपुडा – लग्नावरून सतेज पाटील – राजू शेट्टी यांच्यात जुंपली
shivraj patil chakurkar marathi news, shivraj patil chakurkar latest news in marathi
शिवराज पाटील यांची स्नुषा डॉ. अर्चना पाटील शनिवारी भाजपमध्ये

गेली चार दशके एक दोन अपवाद सोडले तर रायगड जिल्हा परिषदेवर शेकापचे वर्चस्व राहिले आहे. कधी शिवसेनेशी जुळवून तर कधी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन शेकापने जिल्हा परिषदेवरील पकड कायम राखली आहे. जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड राखणारा हा पक्ष आता अडचणीत आहे.

विधानसभा निवडणुकांच्या इतिहासात पहिल्यांदाच रायगड जिल्ह्यातून शेकापचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. मतदारसंघातील जनसामान्याच्या प्रश्नाकडे केलेले दुर्लक्ष, यातून निर्माण झालेली सार्वत्रिक नाराजी पक्षाला चांगलीच भोवली आहे. त्यामुळे रायगड जिल्हा शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा, तिथे आजचे अस्तित्व टिकवण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे पाहायला मिळते आहे. सहकारी पक्षांनी दुर्लक्ष करण्यास सुरवात केल्याने शेकाप एकाकी पडल्याचे दिसून येत आहे.

जुने कार्यकर्ते दुरावले

जिल्ह्यात पूर्वी शेकाप आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर काँग्रेसच्या वर्चस्वाला ओहोटी लागली. तर शिवसेनेची साथ सोडल्यानंतर शेकापची उतरण सुरु झाली. पक्षाशी एकनिष्ठ असलेले जुनेजाणते कार्यकर्ते दुरावले आहेत. तरुण पिढी पक्षात येण्यास फारशी उत्सुक राहिलेली नाही. अशा परिस्थितीत पक्षाची वाताहत रोखणे कठीण होत चालले आहे.

दक्षिण रायगडमधील महाड म्हसळा आणि माणगावचा काही भाग सोडला तर इतर तालुक्यात शेकापचे फारसे अस्तित्व शिल्लक राहिलेलं नाही. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर पनवेल तालुक्यातही पक्षाला घरघर लागली आहे. शहरी भागातील मतदार  दुरावला आहे. ग्रामीण भागात भाजपचे वाढते प्रस्त पक्षासाठी अडचणीचे ठरत आहे. कर्नाळा बँक घोटाळय़ात माजी आमदार विवेक पाटील यांना अटक झाल्याने शेकापची कोंडी झाली आहे. अलिबाग मुरुडमध्ये शिवसेनेचे प्रस्थ वाढत चालले आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेकापला वाटचाल करून जिल्हा परिषदेच्या सत्तामार्ग संपादित करता येणार का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सत्तेचे गणित:

रायगड जिल्हा परिषदेसाठी झालेल्या गेल्या निवडणुकीत शेकापचे सर्वाधिक २३ सदस्य निवडून आले होते. त्याखालोखाल शिवसेनेचे १७ राष्ट्रवादी काँग्रेसचे १७ भाजपचे ३, तर काँग्रेसचे ३ सदस्य निवडून आले होते. पाच वर्षांत जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती बरीच बदलली आहे. शिवसेना आणि भाजपची ताकद वाढली आहे. स्वबळावर जिल्हा परिषदेची सत्ता मिळवणे कुठल्याही एका पक्षाला शक्य राहिलेले नाही. त्यामुळे युत्या आणि आघाडय़ांच्या समीकरणांवर सत्तेची गणितं अवलंबून असणार आहेत.

नव्या समीकरणांची चाचपणी

जिल्हा परिषदेत शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूकपूर्व आघाडी होती. मात्र लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकीनंतर दोन्ही पक्षातील संबंध कमालीचे ताणले गेले. त्यामुळे दोन्ही पक्षात दुरावा निर्माण झाला. विधानसभेतील शेकापच्या पराभवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जबाबदार असल्याची चर्चा सुरू झाली. जाहीर टीकाही झाली. त्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकाच मंचावर फारसे दिसले नाहीत. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरणे पाहायला मिळणार का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.