दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : सांगलीसह मराठवाडय़ामध्ये कार्यरत असलेल्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराने प्रभावित असलेल्या सांगली अर्बन बँकेची निवडणूक गतवेळीप्रमाणेच पारंपरिक विरोधकांमध्येच होत आहे. ज्येष्ठ नेते बापूसाहेब पुजारी यांचे चिरंजीव प्रमोद पुजारी आणि आमदार सुधीर गाडगीळ यांचे बंधू व विद्यमान अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली दोन पॅनेल मैदानात उतरले आहेत.

बँकेच्या १६ जागांसाठी २६ तारखेला निवडणूक होत आहे. गाडगीळ यांच्या पॅनेलचे डॉ. रवींद्र आरळी यांची ब गटातून अविरोध निवड झाली आहे. संघ परिवारातीलच दोन गट आमनेसामने उभे ठाकल्याने ही निवडणूक चुरशीऐवजी नळावरच्या वादावादीसारखी प्रचारात भासत आहे. संघ परिवारातील मतभेदावरून ही निवडणूक होत असली तरी परिणाम भाजपच्या सार्वत्रिक मतपेटीवर होणार नाहीत याचीही दक्षता दोन्ही पॅनेलकडून घेतली जात आहे.

सांगली अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या १६ जागांसाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. सत्ताधारी गाडगीळ गट आण्णासाहेब गोडबोले प्रगती पॅनेलच्या माध्यमातून सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्नशील आहे, तर बापूसाहेब पुजारी गट बँक बचाव पॅनेलच्या माध्यमातून पुन्हा सत्तांतर करण्यासाठी सभासदांना सामोरे जात आहेत. ५९ हजार सभासद असलेल्या या बँकेचे ३३ टक्के सभासद  सांगली-मिरज शहरात, ३३ टक्के जिल्हाभर आणि उर्वरित ३४ टक्के सभासद अन्य जिल्ह्यांत प्रामुख्याने मराठवाडयात आहेत. बँकेच्या ३५ शाखा असून सांगलीसह मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, कोल्हापूर, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, उदगिरी, कुर्डुवाडी, बार्शी, माजलगाव,परतूर, उडोदरा, वसमत, मानवत आदी ठिकाणी शाखा कार्यरत आहेत.

सांगलीसह मराठवाडय़ामध्ये सहकाराच्या माध्यमातून अर्थकारण करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या तत्कालीन कार्यकर्त्यांनी या बँकेची उभारणी केली. आजतागायत निर्णयप्रक्रियेमध्ये प्रामुख्याने प्रस्थापित लोकांचेच वर्चस्व राहिले आहे. अन्य राजकीय पक्षांनी मात्र, या बँकेच्या अर्थकारणात अथवा राजकारणात फारसा हस्तक्षेप केला नाही. बापूसाहेब पुजारी यांनी दूरदृष्टी ठेवून बँकेच्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा उचलला असून त्यांच्या नेतृत्वावर आजही सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचाही विश्वास कायम राहिला आहे.  सहा वर्षांपुर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये पुजारी पॅनेल विरुद्ध गाडगीळ पॅनेल असा  सामना झाला होता. तोच सामना या वेळीही होत आहे. पुजारी पॅनेलला सत्तेवरून खाली खेचून सत्ता हस्तगत करण्यात गाडगीळ गट यशस्वी झाला. मात्र, गाडगीळ गटाच्या हाती सत्तासूत्रे आल्यानंतर बँकेची प्रगती तर फारशी होउच शकली नाही. सभासदांना कर्जवाटप करण्यातही आपपरभाव पाहण्यास मिळाल्याची तक्रार पुजारी गटाकडून होत आहे. बँकेचा एनपीए वाढला असून त्याचा परिणाम बँकेच्या उलाढालीवर झाला असून सभासदांना गेली सहा वर्षे लाभांशही देण्यात आलेला नसल्याचा आक्षेप विरोधक म्हणजे पुजारी पॅनेलकडून होत आहे. मोठय़ा उद्योगांना कर्ज देण्यात गाडगीळ पॅनेलने प्रोत्साहन दिले असले तरी तो व्यावसायिकपणाचा एक भाग म्हटले असले तरी वसुलीसाठी अपेक्षित प्रयत्न केल्याचे दिसत नाही. अनेक कर्जदारांच्या मालमत्ता थकबाकीपोटी बँकेनेच खरेदी केल्या असल्यामुळे त्याचा परिणाम बँकेच्या नफ्यामध्ये घट येण्यात झाला आहे. गेल्या निवडणुकीपूर्वी बँकेवर आर्थिक निर्बंध येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. या वेळी तशी चर्चा नसली तरी बँकेने फार मोठी प्रगती अथवा नफा कमावला आहे असेही नाही. मोठय़ा थकबाकीदारांकडील कर्जवसुलीसाठी प्रयत्न करायला हवे होते. ते केलेही असतील, मात्र फारसा आग्रह न धरता केवळ कायदेशीर बाजूनेच प्रयत्न झाले असावेत असे दिसते. पुजारी गटाकडेही बँकेला फायद्यात  आणण्यासाठी फार मोठा कृती कार्यक्रम सध्या तरी दिसत नाही. केवळ कर्जवसुलीत हयगय, सामान्य सभासदांना कर्ज देत असताना नियमावर बोट आणि बडय़ा कर्जदारांना कर्ज देत असताना नियमांना मुरड घातल्याचा आरोप एवढय़ाच भांडवलावर ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मागील निवडणुकीमध्ये सत्तांतर करण्यात आग्रही असलेले रमेश भाकरे आणि अरिवद कोरडे यांनी गाडगीळ पॅनेलची साथ सोडून पुजारी गटाकडून उमेदवारी दाखल केली आहे. यामागील कारणांचा ऊहापोह या निवडणुकीच्या निमित्ताने अपेक्षित आहे.

अर्बन बँकेच्या सभासदांना गेली सात वर्षे लाभांश दिला नाही, मोठी कर्जे वाटली गेल्याने सामान्य कर्जदारांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास विद्यमान संचालक मंडळ कमी पडले. याची उत्तरे सत्ताधारी पॅनेलला द्यावी लागतील.

रमेश भाकरे, पुजारी पॅनेल.

विरोधकांनी एनपीए लपवून निवडणुकीच्या तोंडावर लाभांश दिला. मात्र, सत्तेवर असताना का दिला गेला नाही, याचे उत्तर विरोधकांनी द्यावे. कर्मचारी बदल्यांबाबत सुसूत्रता नसल्याने त्याचा परिणाम बँकेच्या व्यवसायावर होत होता. या वेळी मात्र, सुसंवाद असल्याने बँक आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न फलद्रूप होत आहेत.

गणेश गाडगीळ, अध्यक्ष