महाआघाडी, महायुती या कशातही सहभागी न होता महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय यशस्वी ठरल्याचं चित्र आहे. भाजपा आणि शिवसेना आगेकूच करत असतानाही काँग्रेसने एकाकी झुंज दिली आहे.
एकूण २८६९ जागांपैकी काँग्रेसने ५२८ जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसने ३१२ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसला मुंबईत लक्षणीय काहीही करता आलं नाही पण अन्य महापालिकांमध्ये काँग्रेसने चांगली आगेकूच केली आहे.
२९ महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्ष तूर्तास तरी तिसऱ्या स्थानी आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसने १६७ जागा लढवल्या. त्यापैकी २३ जागांवर विजय मिळवला. काँग्रेसने भिवंडी निझामपूर, कोल्हापूर, अमरावती, चंद्रपूर आणि लातूर या महापालिकांमध्ये आघाडीवर आहे. लातूरमध्ये त्यांनी बहुमताचा टप्पा ओलांडला आहे.
बाकी सगळे पक्ष युती-आघाड्या करत असताना काँग्रेसने मात्र स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. १९९९ नंतर काँग्रेसने पहिल्यांदाच कुठल्याही पक्षाची साथ न घेता लढायचं ठरवलं.
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा अविभाज्य घटक होता. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राज ठाकरे यांच्याबरोबरीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांच्या गटाशी हातमिळवणी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
२०१९ मध्ये काँग्रेसने सर्वोत्तम कामगिरी केली होती. त्यावेळी भाजप शिवसेना युती निवडणुकांनंतर तुटली होती. एकनाथ शिंदे गट बाहेर पडण्यापूर्वीच्या अखंड शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. महाविकास आघाडीत काँग्रेस आणि फुटीपूर्वीचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेनेबरोबर होता.
मात्र दोनच वर्षात, महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बाहेर पडत भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला.
२०२४ लोकसभा निवडणुकांमध्ये, काँग्रेसने १३ जागा जिंकत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. काँग्रेसने त्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बरोबरीने निवडणूक लढवली होती. लोकसभेतील कामगिरीमुळे काँग्रेसचा हुरुप वाढला. पण २०२४ विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपप्रणित महायुतीने जोरदार पुनरागमन करत विजय मिळवला. काँग्रेस पक्ष १६ जागांसह पाचव्या स्थानी होता.
वर्षभरानंतर काँग्रेसने राज्यभरातील महापालिका निवडणुकांमध्ये तिसरं स्थान राखलं आहे.
