सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगारासाठी आलेल्या उत्तर भारतीय मजुरांमध्ये हत्तीरोगाचे जंतू (मायक्रोफायलेरीया) आढळून आल्याने खळबळ माजली आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने तातडीने पावले उचलत सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत ३० मजुरांच्या रक्तामध्ये हे जंतू सापडले आहेत. सुदैवाने, या मजुरांमध्ये अद्याप कोणतीही बाह्य लक्षणे दिसून आलेली नाहीत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी दिली आहे.

​डिसेंबर २०२५ पासून जिल्ह्यात विशेष मजूर सर्वेक्षण मोहीम राबवण्यात येत आहे. मालवण तालुक्यातील मसुरे येथील मजुरांच्या तपासणीनंतर हे प्रकरण समोर आले. आतापर्यंत एकूण १ हजार ४७९ मजुरांचे रात्रीच्या वेळी रक्त नमुने गोळा करण्यात आले. त्यापैकी ३० मजूर ‘मायक्रोफायलेरीया’ बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

यात प्रामुख्याने:

​उत्तर प्रदेश: २४ रुग्ण,
​बिहार: ५ रुग्ण,
​मध्य प्रदेश: १ रुग्ण,

​प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक पावले

​हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनानेउपाययोजना राबवल्या आहेत.बाधित आढळलेल्या सर्व ३० मजुरांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहवासितांना एकदिवसीय प्रतिबंधात्मक औषधोपचार देण्यात आले आहेत. कीटकसंहारकांमार्फत संबंधित भागात डासांचे नमुने गोळा करून तपासणी केली जात आहे. अळीनाशक फवारणी आणि जनजागृतीवर भर दिला जात आहे.

राज्यस्तरीय पथकाची पाहणी: पुणे येथील राज्यस्तरीय पथक आणि कोल्हापूरचे सहाय्यक संचालक डॉ. संजय रणवीर यांच्या मार्गदर्शनाखाली पथके सध्या मालवण व इतर बाधित भागांत प्रत्यक्ष पाहणी करत आहेत.

​जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आणि आरोग्य पर्यवेक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. त्यांना रक्तनमुना तपासणी आणि पर्यवेक्षकीय सर्वेक्षणाचे सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनाही डासोत्पत्ती स्थाने नष्ट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

“हे रुग्ण लक्षणे विरहीत असले तरी त्यांच्यापासून इतरांना प्रसार होऊ नये यासाठी रात्रीचे रक्तनमुने संकलन वाढवण्यात आले आहे. नागरिकांनी आणि मजुरांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.” असे आरोग्य विभागाने आवाहन केले आहे. दरम्यान सावंतवाडी तालुक्यातील नेमळे येथे चार परप्रांतीय कामगारांत हत्ती रोग संशयीत रूग्ण असल्याचे तपासणीत आढळून आले होते.