अहिल्यानगरः पंतप्रधानांसारख्या व्यक्तीविषयी केलेल्या टीकाटिप्पणीबद्दल शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज, शुक्रवारी अहिल्यानगरमध्ये बोलताना केली. मंत्री राधाकृष्ण विखे आज खरीप हंगामा आढावा बैठकीसाठी नगरमध्ये होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
संजय राऊत यांच्या पुस्तकात पंतप्रधान गृहमंत्री यांच्याबद्दल केलेल्या टीकाटिप्पणीकडे, बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना वाचवले असा उल्लेख पुस्तकात केल्याकडे लक्ष वेधले असता, मंत्री विखे म्हणाले, ‘संजय राऊत विकृती आहे. त्यांचा मी निषेध करतो. पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविषयी बोलणे, लिहिण्याची त्यांची पात्रता नाही. त्यांनी आधी स्वतःच्या पायाखाली काय जळते आहे ते पहावे.’
त्यांचे मुंबईतील भूखंडाचे घोटाळे बाहेर काढले तर त्यांच्या नेत्यांबद्दल स्वतंत्र पुस्तकच छापावे लागेल, अशी टीकाही विखे यांनी बोलताना केली.पंतप्रधानांसारख्या पदाची गरिमा ठेवली गेली पाहिजे. परंतु ज्यांनी जनाधार गमावला आहे, लोकांचा ज्यांच्यावर विश्वास राहिला नाही, त्यांचा अशाप्रकारे पुस्तके लिहून प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई व्हायला हवी, असे विखे म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात बोलताना मंत्री विखे म्हणाले की, या निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरे जाणार आहोत, अपवादात्मक परिस्थितीत काही ठिकाणी वेगळा विचार होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनीच स्पष्ट केले आहे.