विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची मागणी

नगर : राज्यातील अनेक ठिकाणच्या सरकारी रुग्णालयात आगीच्या घटना घडल्या. त्यामधून सुमारे शंभरावर रुग्णांचे बळी गेले. मात्र राज्य सरकार रुग्णालयात आग प्रतिबंधक यंत्रणा उभारण्याची केवळ घोषणा करत आहे. सरकारची ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ ठरल्याने रुग्णांचे मृत्यू ओढावले, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांवरच मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना बळीचे बकरे बनवू नका, अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज, शनिवारी जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या अतिदक्षता विभागास भेट दिली. त्यानंतर त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली तसेच तारकपूर आगारात जाऊन संपावरील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या वेळी माजीमंत्री राम शिंदे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व अरुण मुंडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते.

रुग्णालयातील अगीत ज्यांनी जीव वाचवला त्यांच्याच विरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना बळीचे बकरे बनवले जात आहे, मात्र जिल्हा शल्य चिकित्सक, बांधकाम विभाग, वीज विभाग, अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोकळे सोडले आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? महाराष्ट्रात रुग्णालयात आग लागण्याच्या अनेक घटना घडल्या. परंतु सरकार बेफिकीरीने वागत आहे. सरकारच्या बेफिकिरीचेच हे बळी आहेत, असाही आरोप दरेकर यांनी केला.

शरद पवारांनी शब्द पाळावा

महामंडळ कर्मचाऱ्यांच्या कोल्हापूर अधिवेशनात मुख्यमंत्री व शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे भत्ते, राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाचे आश्वासन दिले होते. पवार यांनी शब्द पाळावा. परिवहनमंत्री अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी घ्यावी. आम्ही उपमुख्यमंत्र्यांची जबाबदारी घेऊ, बैठक बोलवा, देवेंद्र फडणवीस व मलाही बोलवा. आम्ही एसटी महामंडळाला फायद्यात कसे आणता येईल याबाबत सूचना करू. गेल्या पाच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. राज्यात ३९ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या. परंतु परिवहनमंत्री आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची आसवे पुसण्यास गेले नाहीत. उलट भाजप चिथावणी देत असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाचे कर्मचारी हे लहान बाळ आहेत का? त्यांना स्वत:चा मेंदू नाही का, परंतु राज्य सरकार पळ काढत आहे, इतर राजकीय पक्षांची विश्वासार्हता संपल्याने कर्मचारी त्यांना चर्चेसाठी बोलवत नाहीत, असाही आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केला.

मुख्यमंत्री – रझा अकादमीचे संबंध स्पष्ट करा

त्रिपुरामधील घटनेची महाराष्ट्रात प्रतिक्रिया कशी उमटू शकते, असा प्रश्न करून प्रवीण दरेकर म्हणाले की, भाजप चिथावणी देतो हा आरोप संजय राऊत यांनी सिद्ध करून दाखवावा.  दंगल घडत असताना सरकारने बघ्याची भूमिका घेतली, शेपूट घातले. कारण त्यांचे सरकार टिकवण्याला प्राधान्य आहे. मात्र हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरले तर त्यांच्यावर लाठीमार केला जातो. दोन्ही बाजूंना समान न्याय का दिला जात नाही. मुख्यमंत्र्यांनी रझा आकादमीचे प्रमुख मोमीन यांच्याकडून पुष्पहार स्वीकारला. संजय राऊत यांनी या दोघांमध्ये काय संबंध आहेत हे जाहीर करावे. हिंदुत्ववाद्यांवर लाठीमार करताना बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असलेल्या मुख्यमंत्र्यांचा हिंदुत्वाबद्दलचा अभिमान कुठे जातो? हिंदुत्वाला शिवसेनेने वाऱ्यावर सोडून दिले आहे, असाही आरोप त्यांनी केला.