येथील रयत शिक्षण संस्थेच्या काचोळे विद्यालयातील विकृत शिक्षकाने पाचवीतील विद्यार्थिनींना भर वर्गात स्कर्ट वर करून उभे केले. हा घृणास्पद प्रकार आज उघड झाल्याने संतप्त झालेल्या पालकांनी मुख्याध्यापक गोरक्ष शेळके यांना घेराव घालून जाब विचारला. या वेळी रयतच्या उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी भाऊसाहेब शिरसाठ यांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध कडक कारवाईचे आश्वासन दिल्याने पालकांनी संयम राखला. रात्री शहर पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
संतप्त झालेल्या पालकांनी रात्री शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक प्रकाश सपकाळे यांची भेट घेतली. सुमारे शंभराहून पालक पोलीस ठाण्याच्या आवारात ठाण मांडून होते. पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद नोंदवण्यात आली असून, संबंधित विकृत शिक्षक अमोल पालवे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम आठ व अनुसूचित जातिजमाती प्रतिबंधक कायदा व विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आज आयोजित करण्यात आला होता. समारंभानंतर मुख्याध्यापक शेळके आपल्या दालनात आले असता पालकांनी पाचवीच्या वर्गशिक्षकाने आठ मुलींशी गैरवर्तन केल्याबाबत तक्रार केली. पालकांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी पाचवीच्या वर्गात आल्यानंतर आठ विद्यार्थिनींना त्याने उभे केले. वर्गाचे दार बंद करून त्यांना शिक्षा म्हणून कपडे वर करून उभे राहायला सांगितले. हा प्रकार घरी सांगितल्यास शाळेतून काढून टाकण्याची धमकी देण्यात आली. शिक्षकाच्या दहशतीमुळे विद्यार्थिनींनी गेले तीन दिवस हा प्रकार घरी सांगितला नाही, मात्र पालकांना इतर विद्यार्थ्यांकडून सदर घटना समजल्यावर पालकांसह मोठय़ा संख्येने जमाव शाळेत जमा झाला.
संतप्त पालक शाळेत आले असतानाच शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटील कर्मचाऱ्यांसह जुन्या प्रकरणातील चौकशीसाठी शाळेत आले होते. पालकांचा आक्रमक पावित्रा पाहता त्यांनी पालकांना शांत केले. दरम्यान, पंधरा दिवसांपूर्वी रयत शिक्षण संस्थेच्याच पढेगाव येथील यशवंत विद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांना एका शिक्षकाने बेदम मारहाण केली होती. पालकांनी त्याविरुद्ध तक्रार केली. पण संस्थेच्या काही पदाधिका-यांनी हे प्रकरण मिटविले. संबंधित शिक्षकावर व प्रकरण मिटविणा-यांची चौकशी संस्थेने केलेली नाही.