FIR against Rahul Gandhi Priyanka Gandhi Akashvani Bhawan : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मंगळवारी काढण्यात आलेल्या निषेध मोर्चादरम्यान मध्य दिल्लीतील आकाशवाणी भवनात विनापरवाना प्रवेश केल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
मंगळवारी इंडिया आघाडीच्या सुमारे २०० खासदारांनी संसदेच्या मकर द्वारापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत निषेध मोर्चाचं आवाहन केलं होतं. काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली निघालेला हा मोर्चा पार्लमेंट स्ट्रीटवर सुमारे ७०० मीटर अंतर कापल्यानंतर आकाशवाणी भवनाजवळ रोखण्यात आला, येथे पोलिसांनी बॅरिकेड्स लावले होते. राहुल गांधी यांनी पोलिसांचे बॅरिकेड्स ओलांडले. पोलिसांनी खासदार आणि पक्ष कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात करताच, त्यांनी सुरक्षा रक्षकाला आत सोडण्याची विनंती करत आकाशवाणी भवनात प्रवेश केला.
निवडणूक आयुक्तांची भेटीची मागणी
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया रेडिओ कार्यालयाचे मुख्य दरवाजे बंद होते, परंतु प्रवेशासाठी वापरला जाणारा एक लहान दरवाजा उघडा होता. राहुल गांधी यांच्यानंतर प्रियांका गांधी वाड्रा आणि के. सी. वेणुगोपाल व दीपेंद्र हुड्डा यांच्यासह इतर नेतेही इमारतीमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाले आणि त्यांनी निवडणूक आयुक्तांची भेट घेण्याची मागणी केली. आकाशवाणी भवन हे निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापासून सुमारे २०० मीटर अंतरावर आहे.
सात तास ठिय्या आंदोलन
दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इमारतीत प्रवेश करून राहुल गांधी आणि इतर नेत्यांना बाहेर येण्यासाठी समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी आवारात सुमारे सात तास ठिय्या आंदोलन केलं, त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. त्यांना उत्तर-पश्चिम दिल्लीतील किंग्जवे कॅम्पमधील न्यू पोलीस लाईन्स येथे नेण्यात आले.
