पंढरपूर : पदवीधर,शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रामध्ये भाजपा खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी थेट प्रवेश केला. या प्रकरणी पंढरपूर पालिकेचे मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून खासदार सिध्देश्वर महास्वामी यांनी मतदारांवर प्रभाव पाडला, यासह इतर कलमांतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झाले. यावेळी पंढरपुरातील द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रामध्ये  भाजपा खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांनी एका मतदान केंद्राची पहाणी केली.त्यावेळेस राष्ट्रवादीचे शहरअध्यक्ष संदीप मांडवे यांनी या बाबत आक्षेप नोंदवला. तर दुसरीकडे भाजपा खासदारांनी, करोनाचे नियम पाळले जात आहेत का, हे पाहिले. मात्र, मतदान केंद्रांवर आपण प्रचार केला नाही,असा खुलासा केला.

याबाबत पंढरपुरातील प्रांताधिकारी तथा निवडणूक अधिकारी सचिन ढोले यांनी याबाबत चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिले होते. यानुसार मतदान केंद्राध्यक्षांचा अहवाल, तसेच निवडणूक आयोगाचे व्हिडीओ चित्रीकरण आणि मुख्याधिकारी यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर  पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.