प्रबोध देशपांडे, लोकसत्ता

अकोला : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढून जिरवण्यातचे राजकारण सुरू आहे. अकोल्यातदेखील वंचित बहुजन आघाडी व पालकमंत्री बच्चू कडू यांच्यात टोकाचा संघर्ष झाला. रस्त्याच्या कामात एक कोटी ९० लाख रुपयांचा अपहार केल्याची तक्रार वंचित आघाडीने केली. अखेर या प्रकरणांत बुधवारी बच्चू कडूंवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला. आपण कुठलाही गैरकारभार केला नसल्याचे बच्चू कडूंचे म्हणणे आहे, तर प्रशासनानेदेखील तो निर्णय सर्वानुमते घेतल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणांत खरोखरच भ्रष्ट कारभार झाला की सुडाचे राजकारण सुरू आहे, असा सवाल चर्चेत आहे. गुन्हा दाखल झाल्याने बच्चू कडूंच्या अडचणीत मात्र चांगलीच वाढ झाली.

सध्या राज्यासह देशात राजकारणाचा एक वेगळाच रंग दिसून येत आहे. प्रतिस्पर्धी किंवा आपल्या विरोधकांचे नामोहरम करण्यासाठी नेते कुठल्याही पातळीवर जातात. याचे लोण अकोल्यातदेखील पोहोचले. कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पालकमंत्री बच्चू कडू व वंचित बहुजन आघाडीत संघर्ष सुरू झाला. जिल्हा परिषदेकडून जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या रस्त्याच्या कामांच्या प्रस्तावांमध्ये परस्पर बदल करून अस्तित्वात नसलेल्या रस्त्यांवर नियोजन समितीचे अध्यक्ष पालकमंत्री बच्चू कडू यांनी एक कोटी ९५ लाख रुपयांच्या निधीचा अपहार केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली. पोलिसांची तक्रारीची दखल न घेतल्याने वंचित आघाडीने न्यायालय व राज्यपालांकडेदेखील धाव घेतली. अखेर या प्रकरणात शहर कोतवाली पोलीस ठाण्यात बच्चू कडूंविरोधात गुन्हा दाखल झाला. अजामीनपात्र गुन्ह्यात जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्री बच्चू कडू अडकले आहेत.

मुळात अस्तित्वात नसलेल्या रस्त्यावर शासकीय निधीची उधळपट्टी करणे हा गुन्हाच. शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्या संबंधित दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी, यात कुठलेही दुमत नाही. अकोला जिल्ह्यातील कथित रस्ते भ्रष्टाचार प्रकरणांत बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. जिल्हा नियोजन समितीने सर्वानुमते हा निर्णय घेतला असल्याचे समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी निमा आरोरा यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेमार्फत सन २०१५ नंतर ‘पीसीआय’ रजिस्टर, प्राधान्यक्रम यादी अद्ययावत केलेली नाही. त्यामुळे २५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याची निकड व गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या कामांना लेखाशीर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत कामांना मान्यता देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

अकोला जिल्हा परिषदेमध्ये दोन दशकाहून अधिक काळापासून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाची सत्ता आहे. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर व बच्चू कडू यांच्यात पूर्वी स्नेहाचे संबंध होते. शिवसेनेच्या कोटय़ातून राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा परिषदेतील काही प्रकरणांमध्ये लक्ष घातले. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांना ते फारसे रुचले नाही. त्यातून वंचित आघाडी व बच्चू कडू यांच्यात वादाची ठिणगी पडली. दोन्ही बाजूने उणीदुणी काढून एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न झाले. सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून कडू यांनी घेतलेले काही निर्णय त्यांच्याच अंगलट आले आहेत. बच्चू कडू आणि वंचित आघाडीतील संघर्ष आता टोक गाठले. रस्ते कामात खरंच गैरव्यवहार झाला की हा एक राजकीय डाव टाकण्यात आला? यावरून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. आगामी काळात बच्चू कडू आणि वंचित आघाडीतील लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रकरणांत आरोपी वाढणार?

२५ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य यांनी .त्या रस्ते कामाला मंजुरी देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला. या वेळी वंचित आघाडीच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षादेखील उपस्थित होत्या, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. रस्त्यांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी वंचित आघाडीकडून नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून बच्चू कडू यांच्या विरोधात तक्रार देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या प्रकरणांत आणखी आरोपी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

स्वच्छ कारभार असल्याची प्रतिमा निर्माण करणाऱ्या पालकमंत्री बच्चू कडू यांचा भ्रष्ट कारभार असल्याचे रस्ते अपहार प्रकरणावरून दिसून येते. या प्रकरणाचा निष्पक्ष तपास होऊन दोषींवर कारवाई व्हावी, ही आमची अपेक्षा आहे.

डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, तक्रारदार