गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील प्रभादेवी परिसरात शिंदे आणि ठाकरे गट आमने-सामने आले होते. दोन्ही गटात राडा झाल्यानंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यावेळी दादर पोलीस ठाण्यात सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली होती. याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर यांच्यासह काही कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी आता सदा सरवणकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सदा सरवणकर यांच्याविरोधात आता आर्म अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्यांचा बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, याबाबतची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वत: दिली. ते अधिवेशनात बोलत होते.
सदा सरवणकर गोळीबार प्रकरणी माहिती देताना देवेंद्र फडणवीस
“त्याचबरोबर, सदा सरवणकर यांनी आपली परवानाधारक बंदूक स्वत:जवळ बाळगणं आवश्यक असताना त्यांनी बंदूक गाडीत ठेवली. त्यामुळे आर्म अॅक्ट १९५९ च्या कलम ३० अन्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यांनी परवानासंदर्भातील नियमांचं उल्लंघन केल्याने त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती फडणवीसांनी दिली.
नेमकं प्रकरण काय?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रभादेवी परिसरात सदा सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक समोरासमोर आले होते. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर तात्पुरता संघर्ष टळला. मात्र, त्यानंतर या वादाचे पडसाद उमटले होते. प्रभादेवी परिसरात सरवणकर समर्थक आणि शिवसैनिक यांच्यात मारामारी झाला. हे प्रकरण पोलीस ठाण्यात आल्यानंतर सदा सरवणकर यांनी पोलीस ठाण्याच्या आवारात गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांकडून करण्यात आला आहे.