अलिबाग- अलिबाग मुरुड रस्त्यावर मोरीच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मोटरसायकल चालकाचा मृत्यू झाल्यानंतर संबधित ठेकेदार कंपन्या विरोधात पोलीसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. दोन्ही कंत्राटदार कंपन्याविरोधात मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज सारंगे आणि त्यांचे मित्र सचिन सुर्वे हे दोघे मोटर सायकलवरून अलिबागहून मुरुडच्या दिशेने निघाले होते. काशिद ते सर्वेगाव दरम्यान प्रवास करत असतांना, सह्याद्री टुरीस्ट होम जवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. ठेकेदारांनी मोरीच्या कामासाठी रस्ता खोदून ठेवला होता.

खड्ड्यासमोर सुचना फलक, संरक्षक कठडे, टेपिंग पट्टी लावली नव्हती. त्यामुळे सुरज सारंगे यांची मोटरसायकल मोरीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडली. सदर अघातात सुरज सुहास सारंगे वय ३१ वर्षे, रा. सर्वे ता. मुरूड याचा डोक्यास लहान मोठया दुखापती झाल्याने अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. तर सचिन चंद्रकांत सुर्वे हा देखील गंभीर जखमी झाला आहे.

ठेकेदाराचा निष्काळणीपणा सुरज याच्या जिवावर बेतला आहे. तर सचिनही गंभीर जखमी आहे. ही बाब लक्षात घेऊन टरमॅट लिमिटेट व वराह इन्फा लिमीटेड कंपनीच्या ठेकेदाराविरूध्द मुरूड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. फौजदार जनर्दन गदमले मुरूड पोलीस ठाणे हे करीत आहेत. दरम्यान अलिबाग-मुरुड रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम चालु असुन वाहने सावकाश चालवावीत असे आवाहन पोलीसांनी केले आहेत.