कराड : पुणे- बंगळुरू महामार्गाच्या सहा पदरीकरण कामाचे पोटठेकेदार डी. पी. जैन इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या धोंडेवाडी (ता. कराड) येथील कास्टिंग यार्डला आज गुरुवारी (दि. ८) सकाळी आग लागली. या आगीच्या धुराचे लोळ गगनाला भिडताना येथील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

ही आग कशामुळे लागली याची ठोस माहिती उपलब्ध नसली तरी वीज वाहिन्यांत बिघाड (शॉर्ट सर्किट) होऊन आगीची घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. अग्निशामक पाण्याचा बंब बोलावण्यात येऊन त्याच्या माध्यमातून ही आग विझवण्यात आली.

कराडजवळ महामार्गासह उड्डाणपुलाचे रखडलेले काम, तप्त उन्हात वाहनकोंडीने वाहनचालक, प्रवाशी व स्थानिक जनता पुरती हैराण झाली असताना, अलीकडेच कर्मचाऱ्यांनी तीन महिने वेतन व भविष्य निर्वाह निधीची रक्कम न मिळाल्याने कामबंद आंदोलन पुकारले. हे आंदोलन सुरू आहे किंवा काय हे सांगायला कंपनीचा जबाबदार अधिकारीही उपलब्ध नाही. असे असताना, पोटठेकेदार डी. पी. जैन कंपनीच्या धोंडेवाडी येथील कास्टिंग यार्डला आग लागून नुकसान झाल्याने महामार्ग विस्तारवाढीसमोर नवे संकट उभे ठाकले की काय? याची चिंता व्यक्त होत आहे.