शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावरील बरेच काम बाकी असलेल्या उड्डाण पुलावर मंगळवारी सकाळी अपघातात पहिला बळी गेला. पांडवलेणीच्या समोर मालमोटारीच्या धडकेत पादचारी ठार झाला.
गोरख राजाराम देवकर (रा. विल्होळी) असे या पादचाऱ्याचे नाव आहे. अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत ते सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. रात्रपाळी संपवून ते घरी निघाले होते. गरवारे चौकातील उड्डाण पूल ओलांडत असताना मालमोटारीने धडक दिली. त्यात देवकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक लगेच पसार झाला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, महामार्गाच्या विस्तारीकरणात तीन किलोमीटरहून अधिक लांबीचा हा उड्डाण पूल उभारला जात आहे. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले हे काम बरेच बाकी असले तरी त्यातील काही टप्पे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यात घडलेला हा पहिलाच अपघात आहे.