उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली असताना भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यानंतर आता ते राजीनामा देण्यासाठी राजभवनाकडे रवाना झाले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सध्याच्या सत्तासंघर्षाबाबत बोलताना ते म्हणाले की, “महाराष्ट्राच्या राजकारणात मविआचा एक अदभूत प्रयोग शरद पवारांनी केला. महाराष्ट्राच्या विकासासाठी पवार साहेबांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही राजकीय पक्ष एकत्र आणलं. गेली अडीच वर्षे चांगल्याप्रकारे सरकार चाललं.”

त्यानंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्र्यांनी लोकांशी संवाद साधून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. एक सरळ, चांगला, सतशील आणि लोकांच्या सेवेसाठी कटीबद्ध असणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला होता. त्यांनी शेवटचं भाषण करताना सर्वांचे आभार मानले. आज मंत्रिमंडळात देखील सर्वांचे आभार मानले. येणाऱ्या काळात सर्वांना सोबत घेऊन काम करू, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली.”

हेही वाचा- उद्या मुंबईत राडा होणार नाही! उद्धव ठाकरेंचं शांततेचं आवाहन

महाराष्ट्रात शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचं सरकार राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे, हा प्रयत्न महाविकास आघाडीकडून केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे संख्याबळ कमी असताना शिवसेनेनं आमच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला. संख्येची बेरीज झाली, सरकार स्थापन झालं. मात्र शिवसेनेच्या अंतर्गत कलहामुळे सरकार पडलं. मनाचा मोठेपणा दाखवून उद्धव ठाकरेंनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला. करोना सारखं संकट आलं असता, एखादा मुख्यमंत्री किती उत्तम काम करतो, हे उद्धव ठाकरें यांनी देशाला दाखवून दिलं. अडीच वर्षात त्यांनी अनेक चांगली कामं केली, त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते दीर्घकाळ लक्षात राहतील.”