महाविकास आघाडी सरकार कोसळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय कुस्तीगीर महासंघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त केली आहे. शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्यानंतर शरद पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की,आजवर कोणत्या खेळाडूला अर्थसहाय्य केले. हे मी कधीच कोणाला सांगितले नाही. असे सांगत त्यांनी अनेक खेळाडूंच्या नावाची यादी वाचून दाखवली. तर कुस्तीगीर परिषदेच काम बघणार्‍या ज्या काही संघटना असतात. त्या संदर्भातील काही तक्रारी या पुणे जिल्ह्यामधून आल्या, यातील काही तक्रारी राष्ट्रीय संघटनेकडे गेल्या. या तक्रारी बाबत महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने काय उपाय योजना केल्या. याबाबत मला काही माहिती नाही. या संदर्भात काही पदाधिकारी भेटणार आहेत. त्यामुळे अधिकची माहिती मिळण्यास मदत होईल.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय का घेतला गेला, याबाबत राष्ट्रीय पातळीवर विचारणा केल्यावर असे सांगण्यात आले की, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यपद्धती बाबत तक्रारी आल्या आहेत. राष्ट्रीय संघटनेमार्फत राज्याच्या संघटनेला स्पर्धा घेण्याबाबत एक टाईम टेबल करून दिले होते. मात्र त्याबाबत योग्य ती पावले उचलली गेली नाहीत. यामुळे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला गेल्याच मला सांगण्यात आलं आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच ते पुढे म्हणाले की, तसेच यात काही राजकारण नाही. क्रीडा प्रकारात राजकारण कुठलेही नेते आणत नाहीत. महाराष्ट्रात सरकार बदललं म्हणून पण अस काही झाले नाही. तसेच दिल्लीत गेल्यावर ब्रिज भूषण यांच्या सोबत देखील चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. बाळासाहेब लांडगे यांच्यावर आरोप केले जात आहे. त्यावर ते म्हणाले की, काही पदाधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत. त्या दुरुस्ती करू आणि निश्चित मार्ग काढला जाईल. या निर्णयाचा खेळाडूवर कुठलाही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.