दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पावसाळी मासेमारीवरील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्य़ातील मच्छीमारांनी आपल्या होडय़ा समुद्रात लोटल्या आहेत. आता खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासाठी ताजी मासळी लवकरच उपलब्ध होणार आहे.

जूनपासून मोसमी पाऊस सुरू होतो. त्यामुळे समुद्र खवळलेला असतो. हाच काळ माशांच्या प्रजननाचा असतो. शिवाय खवळलेल्या समुद्रात मच्छीमार नौकांना कोणताही अपघात होऊ नये. माशांचे प्रजनन योग्य रीतीने व्हावे यासाठी १ जूनपासून ३१ जुलदरम्यान शासनाने मासेमारी बंदी जाहीर केली होती ती मुदत संपली आहे. जिल्ह्य़ातील एकूण २ हजार २७९ मच्छीमारी नौका मच्छीमारीसाठी समुद्रात उतरल्या आहेत.

रायगड जिल्ह्य़ाला सुमारे २१० कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावरील उरण, अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन या तालुक्यात मोठय़ा प्रमाणात मासेमारी होते. गेल्या दोन महिन्यांपासून मासेमारी बंद असल्याने मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत. खाडीकिनाऱ्यावरील मासळी उपलब्ध होत असली तरी त्याचे भाव सामान्यांना परवडणारे नाहीत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून बोंबील, आंबाडी यांची आवक वाढली आहे. १ ऑगस्टपासून मच्छीमारीला सुरुवात झाली आहे. काही मच्छीमार बोटी १५ ते २० वाव समुद्रात जाऊन मासे पकडण्यासाठी गेल्या असून मच्छीची आवक दोन-चार दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मासे खाणाऱ्यांची चांगलीच चंगळ होणार आहे.

‘काही मोठय़ा होडय़ा मासेमारीसाठी खोल समुद्रात गेल्या आहेत. परंतु समुद्रात अजूनही उधाण आहे. त्यामुळे काहींनी वाट पाहणे पसंत केले आहे. इंजिन दुरुस्तीस, जाळी दुरुस्ती   तसेच रंगकाम अंतिम टप्प्यात आहे. तसेच बोटींची चाचणीदेखील घेण्यात येत आहे. काही कोळीवाडय़ांमध्ये गटारी अमावास्येनंतर, तर काही ठिकाणी नारळी पौर्णिमेनंतरच होडय़ा मासेमारीसाठी पाठवण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे होडय़ा मासेमारीसाठी जातील.’     – सत्यवान पेरेकर, मच्छीमार