नांदेड : मागास आणि उपेक्षित मुखेड तालुक्यातील राठोड परिवाराने स्थानिक आणि जिल्ह्याच्या राजकारणात दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे नेतृत्व स्वीकारत मोठे शैक्षणिक जाळे निर्माण केले. त्यांच्या कमळेवाडीच्या शैक्षणिक परिसरात वेगवेगळ्या प्रकारची झाडे असली, तरी त्यांत ‘अशोका’ची केवळ पाचच झाडे असल्याचे वृक्षगणनेतून समोर आले आहे.
राठोड परिवारातील तिसरे प्रतिनिधी डॉ. तुषार राठोड हे सध्या विधानसभेचे सदस्य असून त्यांचे ज्येष्ठ बंधू गंगाधर हे स्थानिक राजकारण आणि शैक्षणिक संस्थांची जबाबदारी सांभाळत आहेत. राठोड परिवार २०१४ साली काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेला. या पक्षाच्या माध्यमातून त्यांना यश आणि प्रतिष्ठाही प्राप्त झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थेमार्फत मुखेड शहरालगतच्या कमळेवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षक-विद्यार्थ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम पार पाडले जातात. अलीकडे ठिकठिकाणी वृक्षतोड होत असल्याचे पाहिल्यानंतर वरील शाळेचे सहशिक्षक शिवाजी आंबुलगेकर यांनी विद्यार्थ्यांना एकत्र आणले आणि तीन गट करून शाळेच्या परिसरातील वृक्षांची नावे आणि त्यांची संख्या मोजण्याचा उपक्रम राबविला. त्यांत २१ प्रकारची १९२ झाडे असल्याची नोंद कागदपत्रांवर झाली.
अनेक शैक्षणिक संस्थांच्या आवारात ‘अशोका’ची झाडे मोठ्या प्रमाणात असतात. उंच वाढणारे हे झाड त्या परिसराची शोभा वाढवत असले, तरी राज्याच्या एका नेत्याने काही वर्षांपूर्वी त्या झाडांवर ‘स्वार्थी’ असा शिक्का मारला होता. हे झाड आपल्याला सावली देत नाही, असेही या नेत्याने तेव्हा म्हटले होते. कमळेवाडीतल्या वृक्षगणनेत विद्यार्थ्यांना ‘अशोका’ची पाचच झाडे आढळून आली.
शिवाजी आंबुलगेकर यांनी शाळेतल्या या उपक्रमांची माहिती समाजमाध्यमांतून सर्व हितचिंतकांना कळविल्यानंतर त्यांच्या उपक्रमांची सर्वत्र प्रशंसा झाली. राठोड परिवारातील दोन महत्त्वाच्या सदस्यांच्या पश्चात पुढच्या पिढीचे चव्हाण कुटुंबाशी पूर्वीसारखे सख्य राहिलेले नाही; पण खासदार अशोक चव्हाण व डॉ. तुषार राठोड हे एकाच पक्षात कार्यरत आहेत. वृक्षगणनेत ‘अशोका’ची पाचच झाडे आढळल्यानंतर या झाडांची संख्या वाढवू नका, त्याऐवजी एक जलाशय (तलाव) निर्माण करून तेथे कमळ फुलवा, असा सल्ला हितचिंतकांनी राठोड यांना दिला. ‘कमळेवाडी’त कमळ फुललेच पाहिजे, असेही सुचविण्यात आले.
कमळेवाडीतील वृक्षगणनेत नरेंद्र शंकर नकाते, सोहम बेसके, श्रीकांत चौधरी, सुमित राठोड, जय खांडेकर आणि श्रीनिवास मुंडकर या विद्यार्थ्यांनी आपापल्या गटाचे नेतृत्व केले. मुख्याध्यापक संदीप गेटकेवार व सहशिक्षक जाकीर शेख यांनी त्यांना मार्गदर्शन व सहकार्य केले. १९२ झाडांमध्ये सर्वाधिक झाडे लिंबाची आहेत. बोरी, खजूर, बदाम, जांभुळ इ. फळांची झाडे लावण्यात आलेली आहेत. नारळ आणि खजुराचेही झाड तेथे आहे. ही वृक्षसंपदा जपण्याचा निर्धार सर्वांनीच केला.
(कमळेवाडी आश्रमशाळेच्या परिसरात वृक्षगणनेत विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले.)