Lockdown: चंद्रपुरात पाच सिमेंट कारखाने सुरू; १४ उद्योगांनी मागितली परवानगी

हार्डवेअर आणि मोबाईल रिचार्जची दुकानंही सुरू ठेवण्यास परवानगी

संग्रहित छायाचित्र

करोनाबाधितांच्या संख्येनुसार प्रशासनाच्या सोयीसाठी काही विशिष्ट रंगांचे झोन तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार, चंद्रपूरात एकही करोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने जिल्ह्याचा ऑरेंज झोनमधून ग्रीन झोनमध्ये समावेश झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील उद्योगांना लॉकडाउनमधून काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार, चंद्रपुरातील पाच सिमेंट कारखाने सुरु झाले असून इतर १४ उद्योगांनी देखील व्यावसाय सुरु करण्यासाठी प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्णयानुसार मोबाईल रिचार्जची दुकानं सुरू आणि हार्डवेअरची दुकानं उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

प्रशासनाच्या या सूटनुसार, सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत दुकाने उघडी असतील. बुधवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ९० टेम्पो मधून १,५२७ क्विंटल भाजीपाल्याची थेट आवक झाली. तसेच २३ टेम्पो मधून ६२३ क्विंटल फळांचीही आवक झाली. ३ ट्रकमधून ८०३ क्विंटल कांदा-बटाट्याचीही आवक झाली आहे. तर ६२३ टेम्पो व १३ ट्रकमधून १२,०१६.५१ क्विंटल अन्नधान्याची आवक झाली, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वार खाडे यांनी दिली.

दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांविरुध्द जिल्हा प्रशासनाने कारवाई करत जिल्ह्यातील २०७ प्रकरणात एकूण १२ लाख १४ हजार ९७० रुपये दंड वसूल केला आहे. यामध्ये नियमांचे पालन न करणाऱ्या ५६ नागरिकांना अटक करण्यात आली आहे. तर ७२० वाहने जप्त केली आहेत. प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या नियम व सुचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द आणखी कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.

सिमेंट कारखाने सुरू

अल्ट्राट्रेक, एसीसी, माणिकगड, अंबुजा या प्रसिद्ध सिमेंट कंपन्यांच्या ५ प्रकल्पांना सुरुवात झाली आहे. एक-दोन दिवसात या ठिकाणी पुन्हा सिमेंट उत्पादनाला प्रत्यक्ष सुरुवात होईल. याशिवाय १४ उद्योजकांनी आपले उद्योग सुरू करण्याला परवानगी मागितली आहे. आणखी काही उद्योग व्यवसायाला सुरू होईल अशी अपेक्षा जिल्हा उद्योग महाव्यवस्थापक स्वप्निल राठोड यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्याचे संस्थात्मक विलगीकरण

चंद्रपूर जिल्ह्याला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला १४ दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात ठेवणे सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. दरम्यान, ७८ करोना संशयीत रुग्णांपैकी ७७ जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. १२३ लोकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. दरम्यान, गरीब, निराश्रितांना अन्नधान्य पुरवठ्यासोबतच २४ एप्रिलपासून केशरी शिधापत्रिका धारकांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा प्रशासनाने केली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five cement factories open in chandrapur permission requested by the 14 industries aau

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या