परळीतील नेमीचंद बडेरा शिशुगृहातील बालके इच्छुकांना दत्तक देण्यास दिलेला प्रस्ताव लवकर निकाली निघत नसल्याने बालकल्याण समितीच्या परवानगीशिवाय परस्पर ५ बालके दत्तक देण्यात आली. या बाबत निनावी तक्रार येताच जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनामा करून संस्थेच्या सचिवासह शिशुगृहाच्या दोन अधीक्षकांविरुद्ध बालक अपहरणाचा गुन्हा दाखल केला. राज्यभरात या शिशुगृहाची चांगली ओळख असताना संस्थाचालक व प्रशासकीय यंत्रणेतील अंतर्गत वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील परळी येथे जालन्याच्या महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फौंडेशनच्या वतीने नेमीचंद बडेरा शिशुगृह ६ वर्षांपासून चालवले जाते. सेवाभावी वृत्तीने चालवल्या जाणाऱ्या या शिशुगृहात जन्मत:च टाकून दिलेल्या निराधार ६ वर्षांपर्यंतच्या बालकांचे संगोपन केले जाते. बालकल्याण समितीमार्फत बालकांना या शिशुगृहात पाठवले जाते. समितीच्या परवानगीने न्यायालयातून इच्छुकांना कायदेशीरदृष्टय़ा बालक दत्तकही दिले जाते.
मात्र, मागील काही दिवसांपासून संस्थेअंतर्गत वाद निर्माण झाल्यानंतर धरमचंद बडेरा यांनी या शिशुगृहाच्या व्यवस्थापनातून अंग काढून घेतले. त्यानंतर हे शिशुगृह शहराच्या हालगेगल्लीतील एका इमारतीमध्ये २ वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या शिशुगृहात ७३ बालके दाखल झाली. यातील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ४५ बालके इच्छुकांना दत्तक दिली, तर ७ बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सातजणांचे स्थलांतर झाले. एक बालक मयत झाले, तर तीन बालकांचे वय सहा वर्षांचे झाल्यानंतर त्यांना स्थलांतरीत करण्यात आले. आजार व इतर कारणांनी ५ बालके आतापर्यंत मरण पावली. सद्यस्थितीला शिशुगृहाच्या पटावर ११ बालकांची नोंद आहे.
दरम्यान, राज्य दत्तक स्रोत संस्था, पुणे (सारा) यांच्याकडे शिशुगृहाबाबत निनावी तक्रार आल्यानंतर त्यांनी जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार बालसंरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण व क्षेत्रीय कार्यकर्ता गजानन जानवळे यांनी १६ जानेवारीला शिशुगृहाला प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी केली असता केवळ सहाच बालके आढळून आली. पाच बालकांबाबत कर्मचाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे शिशुगृहाला नोटीस बजावून दोन दिवसांत बालके समितीसमोर हजर करण्याचे आदेश दिले. मात्र, बालके दत्तक दिली असल्यामुळे समितीसमोर हजर केले नाही. त्यानुसार मंगळवारी बालकल्याण समितीचे अध्यक्ष दत्ता नलावडे व त्यांच्या सदस्यांनी या बाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना माहिती देऊन शिशुगृहातून ५ बालके गायब असल्याचे सांगितले. त्यानुसार सोमवारी बालकल्याण समिती, बालविकास अधिकारी, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी यांचे पथक परळीत दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत संस्थेच्या प्रतिनिधींनी दत्तक प्रस्ताव वेळेत निकाली निघत नाहीत. त्यामुळे इच्छुकांना चार बालके देण्यात आली आहेत. ती चांगल्या ठिकाणी असून त्यांचे संगोपन सुरू आहे. एका बालकावर हैदराबादला उपचार सुरू असल्याचे सांगितले. मात्र, अधिकाऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही. अखेर कायद्यानुसार परवानगी न घेता बालके दत्तक दिली. त्यामुळे बालकल्याण समितीचे सदस्य भगवान नागोराव देशमुख यांच्या तक्रारीवरून संस्थेचे सचिव वीरेंद्र प्रकाश धोका (जालना) व तत्कालीन अधीक्षक संध्याराणी कांबळे यांच्यासह चौघांविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.